बीड: जीवघेण्या कोरोना आजाराने विळखा घातला असला; तरी बीड जिल्हा सामान्य रूग्णालयात आज दोन रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आनंदित झालेल्या आरोग्य यंत्रणेने या रूग्णांच्या हातून केक कापला, पोलीस बॅन्ड पथकाने वाजत गाजत या रूग्णांना निरोप दिला.
पुणे, मुंबईहून गावाकडे आलेल्या लोकांनी सोबत कोरोना आणला आणि दीड दोन महिने कडेकोट आचारसंहिता पाळलेल्या बीड जिल्ह्यातील गावागावात घबराट पसरली. एकेक करत कोरोनाबाधितांचा आकडा पन्नासच्या जवळपास पोहोचला. बीड, आष्टी, पाटोदा, केज, माजलगाव या शहर तालुक्यात एकेक गाव, गल्ली सील झाली.
जिल्हा रुग्णालयात गेल्या बारा दिवसांपासून उपचार घेत असलेले इटकूर (ता. गेवराई ) येथील 14 वर्षीय मुलगी आणि माजलगाव तालुक्यातील हिवरा येथील एक व्यक्ती आज बुधवारी कोरोनामुक्त झाले आणि जिल्हा सामान्य रूग्णालयात आनंदी आनंद सुरू झाला.
सामान्य रूग्णालयाच्या प्रांगणात आरोग्य कर्मचारी वर्गाने या रूग्णाच्या हातून केक कापला अन् पोलीस बॅन्ड पथकाने वाजत गाजत या दोन रूग्णांना घरी पाठविले. जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ अशोक थोरात, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डाॅ. राधाकिसन पवार. डाॅ सुखदेव राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री बांगर आदी उपस्थित होते.