मुंबई: चीनमधील वुहानसारखेच मुंबईतील बीकेसी येथे केवळ २० दिवसांमध्ये १००८ खाटांचे कोरोना केअर सेंटर (हाॅस्पिटल) तयार करण्यात आले आहे. मात्र, त्याचे कौतुक झाले नाही. महाराष्ट्राचे केंद्राकडे ४२ हजार कोटी थकीत आहेत, अद्याप ते मिळाले नाहीत. केंद्र सरकारने महाराष्ट्रावर कोणतीही मेहरबानी केलेली नाही, असा पलटवार शिवसेना नेते तथा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला.
अनिल परब यांच्यासह महसूल मंत्री तथा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणीस याच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली त्यावेळी अनिल परब बोलत होते.
परब पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या आभासी निवेदनाला आम्ही प्रत्यक्ष उत्तर देत आहोत. १७५० कोटीचे महाराष्ट्राला गहू मिळालेले नाहीत. १२२ कोटी स्थलांतरित मजुरांना निधी देखील मिळालेला नाही. ६८ कोटी रुपयांचा ट्रेनचा खर्च स्थलांतरित मजुरांसाठी महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे. ८० ट्रेन केंद्र सरकारकडून मागवलेले असताना फक्त ३० ट्रेन केंद्र सरकारने दिलेले आहेत. एक ट्रेनला ५० कोटींचा खर्च कसा येतो? महाराष्ट्राला श्रमिक ट्रेन मिळत नाहीत. एका तासाच्या अवधीत ट्रेनची वेळ सांगतात. जाणीवपूर्वक प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण करतात. असे करून सरकारला बदनाम करण्याचे काम चालू आहे. १९,००० कोटी रुपये महाराष्ट्र सरकारला मिळाले असे बोलले पण तसे नसून १८,२७९ कोटी हक्काचे पैसे महाराष्ट्राला अजून मिळालेले नाहीत. केंद्र सरकारने जीएसटीचे महाराष्ट्राचे हक्काचे पैसे अजूनही दिलेले नाहीत. पियुष गोयल हे फक्त ट्वीटरवरून घोषणा करतात, प्रत्यक्षात काहीही करत नाहीत. कायद्यात बसणारे पैसे तरी महाराष्ट्र सरकारला मिळाले पाहिजेत. महाराष्ट्राचे केंद्राकडे ४२ हजार कोटी थकीत आहेत. महात्मा फुले योजनेअंतर्गत १२ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी वाटले गेले. सुरुवातीला केंद्र सरकार आम्हाला साहित्य देणार असे बोलले होते पण ते दिलेले नाही. पीपीई कीट आणि N-95 मास्कचे पैसे राज्य सरकार केंद्राला देणार आहे केंद्र सरकारने कोणतीही गोष्ट फुकट महाराष्ट्र सरकारला दिलेली नाही, असेही अनिल परब म्हणाले.
यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले, संपूर्ण जगावर कोरोनाच संकट आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एकत्र काम सुरू आहे. महाराष्ट्र हे उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. परराज्यातील कामगारांच संगोपन महाराष्ट्र सरकारकडून झालेल आहे. तसेच इथून त्यांना घरी पाठवण्याची सोय देखील आपण केलेली आहे. राज्य सरकार परप्रांतीयांची व्यवस्थित सोय करत आहे. मुंबईची स्थिती ही काळजीची आहे. मुंबईसाठी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष घालून उपाययोजना केलेली आहे. विरोधी पक्षाकडून आम्ही सहकार्याची अपेक्षा केली होती, परंतु सरकारला बदनाम करायचे काम त्यांच्याकडून होत आहे. आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू आणि जनतेला कोरोनाच्या संकटातून मुक्त करणार आहोत. विरोधकांकडून सहकार्य करायच्याऐवजी समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.
जयंत पाटील म्हणाले, भारतात जर कुठे उत्तम काम झालं असेल तर ते मुंबई आणि महाराष्ट्रात झालेल आहे. WHO बोलले होते की १.५ लाख केसेस होतील परंतु आमच्या अंदाजाने फक्त ६० हजार केसेस असतील हे महाराष्ट्र सरकारचे उत्तम काम असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.