नांदेड: नांदेड शहरातील कन्टेन्मेंट झोन असलेल्या अबचलनगर परिसरात मागील एक महिन्यापासून माणसांची वर्दळ कमी झाल्याने मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. परिसरात मोकाट जनावरांसह रात्रंदिवस गाढवांचे कळप गोंधळ घालत आहेत. यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. या मोकाट जनावरांना व गाढवांच्या कळपांना आवर घाला, अन्यथा रस्त्यावरील हा गाढवांचा गोंधळ सोशल मीडियावर व्हायरल करणार, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार रविंद्रसिंग मोदी यांनी दिला आहे.
यासंदर्भात मोदी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कन्टेन्मेंट झोनमध्ये माणसांची वर्दळ कमी झाल्याने रस्त्यावर मोकाट जनावरे व गाढवांचे कळप गोंधळ घालत आहेत. यामध्ये गाढवांसह गाय, बैल, म्हशी, डुकरे यांचा वावर वाढला आहे. या मोकाट जनावरांच्या वावराने व गाढवांच्या किंचाळण्याने परिसरातील नागरिकांची झोपमोड होत आहे. तसेच कोरोनाचे संक्रमण हे जनावरांच्या माध्यमातूनही होत असल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे धोका वाढला आहे. हा प्रकार महापालिकेच्या लक्षात आणून दिला आहे, तरीही महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. महापालिकेने ही मोकाट जनावरे व गाढवांचा गोंधळ याकडे लक्ष देऊन याचा त्वरित बंदोबस्त करावा, अन्यथा रस्त्यावरील हा गाढवांचा गोंधळ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येईल, असा इशारा रविंद्रसिंग मोदी यांनी दिला आहे.