नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलाच्या प्रभारी संचालकपदी डॉ. पी. विठ्ठल यांची नियुक्ती कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केली आहे. येत्या एक जून रोजी ते पदभार स्वीकारणार आहेत.
डॉ. पी. विठ्ठल हे विद्यापीठातील भाषा संकुलात मराठीचे प्राध्यापक असून नामवंत कवी आणि समीक्षक आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राचे ते समन्वयकही आहेत.
त्यांचे ‘शून्य एक मी’, ‘माझ्या वर्तमानाची नोंद’ हे कवितासंग्रह प्रसिद्ध असून ‘करुणेचा अंतःस्वर’, ‘संदर्भ : मराठी भाषा’ हे लेखसंग्रह तर ‘मराठी कविता : समकालीन परिदृश्य’, ‘जागतिकीकरण सामाजिक वास्तव आणि समकालीन मराठी कविता’ हे समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध आहेत. याशिवाय ‘वाड्मयीन प्रवृत्ती : तत्त्वशोध’, ‘विशाखा : एक परिशीलन’, ‘सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘जनवादी साहित्यिक अण्णा भाऊ साठे’, ‘शिक्षणवेध’ इ. संपादने प्रसिद्ध आहेत. मुंबई, अमरावती, जळगाव, गडचिरोली आणि नांदेड विद्यापीठात त्यांच्या कवितांचा अभ्यासक्रमात समावेश आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. वैजयंता पाटील, डॉ.दीपक बच्चेवार, महेश मगर, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, अधिष्ठाता डॉ. भगवान जाधव, डॉ. लक्ष्मण वाघमारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे, डॉ. डी. एम., डॉ. जी. बी. कतलाकुटे, भाषा संकुलाच्या संचालक डॉ. शैलजा वाडीकर, डॉ. केशव सखाराम देशमुख, डॉ. श्रीकांत अंधारे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांनी अभिनंदन केले आहे.