पुणे: राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्यमहाराष्ट्रात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट आणखी दोन दिवस कायम राहील. मात्र, त्यानंतर राज्यातील सर्वच भागात मान्सूनपूर्व पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
उष्णतेच्या तीव्र लाटेने अवघा महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. आता मात्र, ही होरपळ थांबणार असून, 30 तसेच 31 मे पासून मध्यमहाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश भागात मेघगर्जना, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पाऊस पडणार आहे. 31 मे ते 4 जून दरम्यान अरबी समुद्राच्या पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. या पट्ट्याच्या प्रभावामुळे मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावणार आहे. दरम्यान, राज्यातील विदर्भासह मराठवाडा आणि मध्यमहाराष्ट्राच्या बहुतांश शहराचे कमाल तापमाना 45 ते 46 अंशाच्या आसपास नोंदले गेले आहे. त्यामुळे कडक उन्हामुळे होरपळ चांगलीच वाढली आहे.