# राज्यात एकूण ५९ हजार ५४६ पॉझिटिव्ह रुग्ण; आज ८५ कोरोनाबाधितांचा मृत्यू.

 

मुंबई: राज्यात आज कोरोनाच्या २५९८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या राज्यात ३८ हजार ९३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ६९८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत १८ हजार ६१६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ५९ हजार ५४६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज गुरूवारी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख १९ हजार ४१७ नमुन्यांपैकी ५९ हजार ५४६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ६ लाख १२ हजार ७४५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार १२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  राज्यात ८५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळनिहाय मृत्यू असे: ठाणे- ४९ (मुंबई ३८, वसई विरार ४, ठाणे ४, नवी मुंबई २, रायगड १), नाशिक- १ (जळगाव १), पुणे- २६ (पुणे मनपा १०, सातारा ९, सोलापूर मनपा ७), औरंगाबाद- ३, लातूर-१ (नांदेड मनपा), अकोला- ५ (अकोला मनपा ५)

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६० पुरुष तर २५ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ८५ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४५ रुग्ण आहेत, तर ३१ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ९ जण ४० वर्षांखालील आहेत. या ८५ रुग्णांपैकी ४५ जणांमध्ये (५३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ३७ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १५ मे ते २५ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ४८ मृत्यूंपैकी मुंबई २२, सोलापूर -५ , अकोला ४, औरंगाबाद ३, सातारा ३, ठाणे ३, वसई विरार ३, जळगाव १, नांदेड १, नवी मुंबई १, पुणे १ आणि रायगड येथील १ मृत्यू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *