# राज्यात आज एकाच दिवशी उच्चांकी ८,३८१ रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज -आरोग्यमंत्री राजेश टोपे.

 

मुंबई: कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने आज उच्चांक गाठला. एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून त्यातील सर्वाधीक ७३५८ रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत राज्यभरात २६ हजार ९९७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २६८२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३३ हजार १२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज शुक्रवारी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ३३ हजार ५५७ नमुन्यांपैकी ६२ हजार २२८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ३५ हजार ४६७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार ९६७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात ११ दिवस होता तो आता १५.७ दिवस झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ४३.३८ टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर ३.३७ टक्के आहे.

राज्यात ११६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळनिहाय मृत्यू असे: ठाणे- ५८ (मुंबई ३८, ठाणे १, भिवंडी ३, नवी मुंबई ९, रायगड २, मीरा-भायंदर ३, पनवेल १, कल्याण डोंबिवली १), नाशिक- ३२ (जळगाव १७, नाशिक ३, मालेगाव ५, धुळे ७), पुणे- १६ (पुणे मनपा १३, सोलापूर ३), कोल्हापूर-३, औरंगाबाद- ५, अकोला- २ (अमरावती २) आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७७ पुरुष तर ३९ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ११६ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४८ रुग्ण आहेत तर ५५ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहे. या ११६ रुग्णांपैकी ७५ जणांमध्ये (६५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २०९८ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ४६ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १६ मे ते २६ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७० मृत्यूंपैकी मुंबई १६, जळगाव- १४, नवी मुंबई -९, धुळे -६, मालेगाव -५ , औरंगाबाद ३, भिवंडी-३, नाशिक -३ , अमरावती -२ , कोल्हापूर -२, मीरा भाईंदर -२ , रायगड -२ , सोलापूर -२ आणि १ मृत्यू ठाणे येथील आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *