औंरगाबाद: औरंगाबादेत सध्या मेल्ट्रॉनच्या इमारतीमध्ये 250 खाटांचे कोविड रूग्णालय एमआयडीसीमार्फत उभारण्यात येत आहे. सर्व सुविधांयुक्त असलेले रुग्णालय मनपाकडे 10 जूनपर्यंत सोपविण्यात येईल. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर संबंधित रुग्णालय विशेष संसर्गजन्य रुग्णालय करण्याबाबत शासन स्तरावरून कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज शनिवारी येथे दिली.
सिंचन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. देसाई बोलत होते. यावेळी खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, माजी खासदार चंद्रकांत खैरे, किशनचंद तनवाणी यांची उपस्थिती होती.
श्री. देसाई म्हणाले, औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये प्रयोगशाळा सुसज्ज करण्यात येत आहे. या प्रयोगशाळेच्या प्रगतीचा आढावा आज घेण्यात आला. या प्रयोगशाळेसाठी आवश्यक असणारा एक कोटी 23 लाख रुपयांच्या साधनसामुग्रीसाठी शेंद्रा येथील औरंगाबाद इंडस्ट्रीयल टाऊनशीप लिमिटेड या कंपनीच्या सीएसआर निधीतून विद्यापीठास निधी देण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रयोगशाळेची निधीची पूर्तता करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळेत साधनसामुग्री प्राप्त झालेली आहे, काही साधनसामुग्री येण्याच्या मार्गावर आहे. सात जूनपर्यंत प्रयोगशाळा पूर्णत: कार्यरत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या प्रयोगशाळेत कोरोना विषाणू तपासणीबरोबरच, विषाणूंबाबत संशोधन, वहन, औषधी, लस याबाबतही कार्य होईल. कोरोना योद्धे त्यांचा जीव धोक्यात घालून, जोखीम पत्करून जनतेवर उपचार करत आहेत, त्यांच्याकरीता देखील या प्रयोगशाळेतून होणाऱ्या संशोधनाची मदत होणार आहे. आरोग्याच्या रक्षणासाठी या प्रयोगशाळेतून काम होईल, असेही ते म्हणाले.
औरंगाबाद शहरातील, जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत आहे. प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे, हा सर्व परिणाम जनतेने दिलेल्या सहकार्यातून शक्य झाला आहे. औरंगाबादेत 8 मे रोजी 100 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. परंतु दिवसेंदिवस या रुग्णांमध्ये घट होते आहे. ही चांगली बाब असल्याचे ते म्हणाले. लॉकडाऊनचा नागरिकांना त्रास झाला. परंतु नागरिकांच्या हितासाठीच शासनाने निर्णय घेतला. जनतेनेही त्याला उत्तम प्रतिसाद दिला. ग्रामीण भागात आता उद्योगांना परवानगी दिली आहे. प्रवासालाही परवानगी दिलेली आहे. शहरात बंधने होती, प्रसंगी प्रशासनाने कटुता स्वीकारत जनतेच्या हिताचे निर्णय घेतले, त्यामुळे आता संसर्ग कमी होताना दिसत आहे. कालांतराने तो पूर्णत: कमी होईल आणि आपण कोरोनातून मुक्त होऊ, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी शहरात दोन हजार खाटांची सुसज्जता करण्यात येत आहे. खबरदारी म्हणून प्रशासन सज्ज आहे. घाटी, मिनी घाटीतील औषध साठा, मनुष्यबळाचा देखील आढावा घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी नागरिकांनी आतापर्यंत घेतलेली खबरदारी यापुढेही घ्यावी. मास्क वापरावा, शारीरिक अंतर पाळावे, सॅनिटायजरचा वापर करावा अथवा वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवावेत, असेही त्यांनी आवाहन केले.
शहरातील 21 ताप तपासणी केंद्राबरोबरच ताप तपासणी शिबिरे घ्यावीत. ज्या प्रभागात अधिक रुग्ण आहेत, तिथे ताप तपासणी करण्यात याव्यात, याबाबत मनपा प्रशासन, जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. खासगी डॉक्टरांनीदेखील यामध्ये पुढाकार घ्यावा. जिल्ह्यात रक्ता पुरवठा कमी होत असल्याने रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले. मनपाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले ‘माझी हेल्थ माझ्या हाती’ या ॲपचा वापर करावा. या ॲपच्या माध्यमातून होणारी स्क्रीनिंग यातून कोरोनाचा संसर्ग रोखता येऊ शकतो, असेही ते म्हणाले.
पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील इतर प्रश्नांचाही आढावा घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यामध्ये टोळधाडीसाठी करावयाचे नियंत्रण, बांधावर बियाणे, खते वाटप, भाजीपाला खरेदी, टँकर मागणीचे तालुकास्तरावर निर्णय, कापूस खरेदी केंद्र, तूर, हरभरा, मका खरेदी, जिल्ह्यासाठी आवश्यक निधीची उपलब्धता करून देणे याबाबतही आढावा घेतल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.