नांदेड: नांदेड शहरात आज आणखी तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्या १४९ वर पोहोचली आहे. या पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये देगलूर नाका भागातील ४५ वर्षीय डॉक्टर व त्यांच्या २५ वर्षीय सहायकाचा समावेश आहे.
यापूर्वी मुखेड ग्रामीण रुग्णालय व नांदेडच्या विवेक नगर भागात मुंबईहून परतलेले डॉक्टर बाधित असल्याचे आढळले होते. आज पॉझिटिव्ह आलेले जिल्ह्यातील हे तिसरे डॉक्टर आहेत. बाधितांवर उपचार करणाऱ्या मुखेडच्या एका नर्सलाही कोरोनाची बाधा झाली होती. दरम्यान, जिल्ह्यातील १०४ जणांना उपचार करून घरी पाठवले असून, ३७ जणांवर उपचार सुरू आहेत, तर आजपर्यंत एकूण ८ जणांचा मृत्यू झालेला आहे.
आज आरोग्य विभागाला ४३ नमूने प्राप्त झाले आहेत. यापैकी तीन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे आहेत. ३९ जणांचे निगेटिव्ह तर एक रिपोर्ट अनिर्णित आहे. शिवाजीनगर नई आबादीमधील एका ४० वर्षीय रूग्णाचा बाधितांमध्ये समावेश आहे. पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले डॉक्टर व त्यांचा सहायक यांचा मिल्लतनगरमधील कोरोनाबाधित असलेल्या बेकरीचालकाशी संबंध आला होता. धक्कादायक बाब म्हणजे या बेकरीचालकाचा कोरोनामुळे नुकताच मृत्यू झालेला आहे. त्यामुळे चिंता वाढली असून पॉझिटिव्ह आलेले डॉक्टर व त्यांचा सहायक यांचा आणखी किती जणांशी संपर्क आला होता हे आरोग्य यंत्रणेला शोधून काढावे लागेल. तसेच त्यांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करणे आवश्यक आहे.