स्वातंत्र्योत्तर काळात सातत्याने बदलत गेलेल्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा विचार करता परिवर्तनाच्या चळवळीला आग्रहाने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिलेदारांना ‘एकला चलो रे’ या भूमिकेने काम करण्याशिवाय पर्याय उरलेला नव्हता आणि आजही तो उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबा आढाव यांच्या गेल्या ७० वर्षातील कार्याकडे पाहिलं, तर ‘सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील तेजस्वी दीपस्तंभ’ म्हणून ते आपल्या समोर येतात. आज बाबा आपल्या वयाची नव्वद वर्षे पूर्ण करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यावर टाकलेला हा प्रकाशझोत…
समाजातील आर्थिकदृष्ट्या सुस्थिर वर्गाला सेवा पुरवणाऱ्या घटकांना आपल्या समाजात अजिबात प्रतिष्ठा नाही. जो पांढरपेशा वर्ग सेवांचा लाभ घेतो तोही उपेक्षित घटकांच्या पाठिशी उभा राहायला तयार नाही. या नाकारलेल्या, विस्कळीत आणि फुटकळ कामात गुंतलेल्या कष्टकऱ्यांचं संघटन करणं जिकीरीचं नी अवघड काम असल्याने कामगार संघटना त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. अशी सारी विपरीत परिस्थिती असताना बाबा आढाव यांनी गेल्य सात दशकांच्या प्रयत्नातून एक मोठं काम उभं केलं आहे. देशातल्या ४० कोटींहून अधिक असणाऱ्या असंघटित कामगारांना कायद्याचं संरक्षण देण्याची मागणी करण्यापर्यंतची ताकद आणि ऊर्जा बाबांच्या प्रयत्नातून मिळत आहे. कष्टकरी असंघटित समूहापर्यंत स्वातंत्र्याचा सूर्य पोहोचवू पाहाणारी जी माणसं देशात कार्यत आहेत, त्यात बाबा आढाव यांचं काम सर्वाधिक मोलाचं आणि वरचं आहे. नाडलेल्या, नाकारलेल्या उपेक्षित घटकांपर्यंत स्वातंत्र्याचे आणि सार्वभौमत्वाचे लाभ पोहोचवण्याचं त्यांचं काम पथदर्शक आहे. कष्टकरी समूहांना एकत्र करणं, रचनात्मक मार्गाने कल्याणकारी प्रकल्प उभारून आधार देणं आणि शासनयंत्रणा व संबंधितांशी संघर्ष करून न्याय मागण्या पदरात पाडून घेणं असं तिहेरी काम त्यांनी केलं आहे.
बाबा आढाव यांच्य या कामाला एक गाव एक पाणवठा मोहीम, महात्मा फुले समता प्रतिष्ठान, विषमता निर्मूलन परिषद, सामाजिक कृतज्ञता निधी असे इतरही अनेक आयाम आहेत. जातिनिर्मूलन, जातिअंतासाठी राजकारण, प्रबोधनाच्या चळवळीतील कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, महात्मा फुले, सत्यशोधक समाज व ब्राम्हणेत्तर चळवळीशी संबंधित संशोधन अशा अंगानेही बाबांनी महत्त्वपूर्ण काम केलं आहे. पुण्यातील कष्टकऱ्यांसाठी काम करता करता आणि आपल्या कामाचा पसारा वाढवता वाढवता बाबांनी महाराष्ट्रातील कामगार चळवळीला व कष्टकऱ्यांसाठी लढणाऱ्यांनाही नवी दिशा दिली. कामगार चळवळीला निव्वळ आर्थिक लाभाची चळवळ बनू न देता भक्कम वैचारिक आधार दिला. चळवळीतील कामगारांना, कष्टकऱ्यांना व्यापक सामाजिक प्रश्नांवर भूमिका घ्यायला भाग पाडलं. जातिव्यवस्था, जातिभेद यावर महात्मा फुलेंच्या विचारांनुसार निर्णय घ्यायला शिकवलं. त्यांनी आपल्या आजवरच्या कामातून ‘मी जसा विचारशील आहे तसाच कृतीशील, कार्यशील आहे’ हे सातत्याने दाखवून दिले.
बदल, परिवर्तन याकडे केवळ ‘सत्तांतर’ म्हणजे सत्तेत बदल एवढ्याच मर्यादित अर्थाने जेव्हापासून बघितलं जावू लागलं तेव्हापासून सत्तेसाठी केलं जाणारं पक्षीय राजकारण हा इथला मूळ प्रश्न बनला. भारतीय संदर्भात बोलायचं झालं तर, सत्तेचं राजकारण करायला हरकत नाही. मात्र, ते राजकारण सामाजिक बदलांसाठी केलं पाहिजे. म्हणजे राजकीय सत्तेने लोकशाही मार्गाचा अवलंब करत प्रशासनाच्या माध्यमातून नवीन मूल्य रुजवण्याच्या हेतूने व्यवस्थेत बदल घडवून आणले पाहिजेत. हे काम कठीण असलं तरी लोकशाही – सत्याग्रही समाजवादी विचारांच्या अंगीकारातून ते सहज शक्य आहे. कदाचित म्हणूनच घटनाकारांनी भारत हा एक समाजवादी देश बनला पाहिजे अशी तरतूद घटनेतच करून ठेवली आहे. विचारांचा हाच वसा घेऊन डॉ. बाबा आढाव यांनी ‘मतपेटी-तुरुंग- फावडं’ ही त्रिसूत्री अंगीकारत समाजवादातून सामाजिक परिवर्तन या लढ्यात स्वतःला ढकलून दिलं. ते साल होतं १९५२ चं. सामाजिक न्याय या तत्त्वाशी बांधिलकी या एकाचप्रेरणेतून त्यांनी यावर्षीच्या अन्नधान्य भाववाढविरोधी सत्याग्रहात उडी घेतली. त्यांच्या आयुष्यातला हा अत्यंत उमेदीचा काळ होता. अशा काळात त्यांना या सत्याग्रहातील सहभागामुळे तीन आठवड्याची तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्यानंतर आजवरच्या वाटचालीत त्यांच्या आयुष्यात असे प्रसंग अनेकदा आले, पण त्यांनी कधीच आपल्या विचारांशी असलेली बांधिलकी सोडली नाही की, कुठली तडजोड केली नाही. खंत एकच आहे की, आज या वयातही त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याला अशा रस्त्यावरच्या लढ्याला वारंवार तोंड द्यावं लागत आहे. त्याचं कारण केवळ सत्तेसाठी सुरू असलेल्या पक्षीय राजकारणातून सामाजिक परिस्थितीचं सातत्यानं ढासळणं हे होय. याचा अनुभव बाबा अगदी सुरूवातीपासून घेत आलेले आहेत. त्यातूनच त्यांनी मतपेटीच्या माध्यमातून समाजहिताचे बदल घडवून आणण्याला प्राधान्य देण्याच्या भूमिकेतून थेट राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यातून त्यांनी १९६३ साली पुणे महापालिकेची निवडणूक लढवली आणि ते पालिकेच्या सभागृहात गेले. त्यानंतर खेड मतदारसंघातून १९६७ साली लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली. त्यात मात्र त्यांना पराभवाला सामोर जावं लागलं. असं असलं तरी लोकप्रतिनिधी म्हणून आपण जेव्हा सभागृहात जातो तेव्हा जनतेचं हीत कशात आहे हे पाहिलं पाहिजे. सत्तेसाठी तिथे कोणतीही तडजोड करता कामा नये, अशा भूमिकेतून ते निवडणुकीकडे पाहातात. त्याच भूमिकेतून त्यांनी पुणे महापालिकेत काम केलं. इतकंच नव्हे, तर झोपडपट्टीच्या विकासासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात मागणी करूनही पुरेशी तरतूद केली जात नाही हे जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून थेट निवडणुकीत त्यांनी कधी भाग घेतला नाही, पण राजकारण्यांना एका विशिष्ठ भूमिकेतून समाजहिताचे निर्णय घेण्यासाठी त्यांनी अनेकवेळा भाग पाडले आहे.
मतपेटीतून समाजहिताचे बदल घडवून आणण्याला सत्तेच्या राजकारणात खूप मर्यादा येतात. याचा अनुभव आणीबाणीनंतरच्या जनता राजवटीने देशाला दिला आहे. आणीबाणीच्या विरोधात विविध विचारांचे, पक्षाचे लोक एकत्र आले होते. ते येरवडा कारागृहात एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांनी सत्ता काबिज करण्यासाठी जनता पक्षाचा पर्याय मांडला. समाजवादी पक्ष त्यात विलीन झाला. यातून सत्ता मिळाली, परंतु परिवर्तनाचं मूळ उद्दिष्टच पराभूत झालं. शिवाय समाजवादी विचारांची, चळवळीची वाताहत झाली. याच भूमिकेतून डॉ. बाबा आढाव यांनी समाजवादी पक्षाने जनता पक्षात विलीन होण्याला तीव्र विरोध नोंदवला होता. परंतु त्यावेळी समाजवादी मित्रांनी, नेत्यांनी त्यांचं ऐकलं नाही. उलट जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणीबाणीनंतर बदलला आहे. त्यांच्या नेत्यांचे परिवर्तन झाले आहे असा प्रचार या राजवटीत केला गेला. तेव्हा संघाचं हे ढोंग उघड करणाऱ्या ‘संघाचे ढोंग’, आणि ‘संघापासून सावध’ अशा दोन पुस्तिका बाबांनी लिहिल्या. त्यावेळी या दोन्ही पुस्तिकांनी प्रचंड खळबळ उडवून दिली होती. अर्थात अशा शाब्दिक मांडणीतून सर्वसामान्यांच्या, दलितांच्या, उपेक्षितांच्या, कष्टकऱ्यांच्या जवळ जाता येत नाही. त्यासाठी कृती महत्त्वाची. हे ओळखून बाबांनी रस्त्यावर उतरून वेगवेगळ्या पातळीवर लढा द्यायचं असं ठरवलं आणि रचनात्मक, संघटनात्मक कामात स्वतःला झोकून दिलं. त्यातून मग एक गाव एक पाणवठा ही अत्यंत महत्त्वाची अशी चळवळ उभी राहिली. हमाल पंचायतीच्या माध्यमातून हमांलांचं राज्यव्यापी संघटन उभं राहिलं. त्यांना माथाडी कायद्याखाली संरक्षण मिळून देण्यापर्यंत या संघटनेनं मजल मारली. अशाच पद्धतीने कागद-काच-पत्रा वेचणाऱ्यांचं संघटन उभं केलं. त्यांना त्यांचं न्याय हक्क मिळवून दिले. अशा एका एका घटकाला घेऊन त्यांचं संघटन उभारताना बाबांनी एका व्यापक भूमिकेतून उपेक्षितांचे प्रश्न समाजासमोर मांडलं. ते ऐरणीवर आणले आणि त्यातून खूप मोठं असं रचनात्मक कामही उभं राहिलं. झुणका भाकर केंद्रांची मोठी शृंखला हे त्याचं उदाहरण म्हणून सांगता येईल.
हमाल, कामगार आणि इतर कष्टकरी जनतेपैकी बहुतेकजण निरक्षर असतात. त्यांना सामाजिक न्याय, स्वतःचे हक्क, स्वतःची होणारी आर्थिक पिळवणूक अशा संकल्पनांचे मुळीच ज्ञान नसते. त्यांना त्याची जाणीव करून देण्यासाठी मोर्चे, निदर्शने वगैरे लढ्याची गरज असते. बाबांनी असे लढे आपलं कार्यक्षेत्र बनवलं आणि त्यामाध्यमातून समाजातल्या अशा कितीतरी उपेक्षित घटकांना मान, सन्मान, पत मिळवून दिली. स्वतःचे श्रम विकून आपले पोट भरणाऱ्या एका फार मोठ्या घटकास समाजात मानाचे स्थान, पत नाही याचे आपल्याला कुठेतरी वैषम्य वाटले पाहिजे. ते वाटले की मार्ग निघतो. बाबांनी पथारीवाले, कागद-काच-पत्रा वेचणारे यांचे संघटन यातूनच केलं. समाजाचा एक महत्त्वाचा घटक पण दुर्लक्षित राहिलेला. त्याला बाबांनी नवी ओळख मिळवून दिली. स्वच्छतादूत म्हणून त्यांना मानाचं स्थान मिळवून दिलं. वाहतूक व्यवसायातील व्यापाऱ्यांनी स्वतःच्या वाहनांना ठेवण्यासाठी गॅरेज नाही म्हणून ही वाहने भर रस्त्यावर उभी केली तर कुणीच आक्षेप घेत नाही. परंतु एखाद्या गरीब पोटभरू व्यक्तीने ह्याच रस्त्यावर फळभाज्या व इतर वस्तू विकावयास सुरूवात केली, तर लगेच पोलीस, नगरपालिका यांच्याकडून कारवाई सुरू होते. हा पक्षपातीपणाचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी पथारीवाल्यांचं संघटन केलं आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यातून हमालांपासून रिक्षाचालकांपर्यंत अनेकांना ‘एक मत आणि समान पत’ याची जाणीव झाली. आज हा संपूर्ण वर्ग जो एकेकाळी आपल्याच विवंचनेत गुरफटून गेलेला होता तो आज सर्वसामान्यांच्या कोणत्याही प्रश्नावर रस्त्यावर यायला केव्हाही तयार असतो. म्हणूनच पुण्यातलं हमाल पंचायचीचं हमाल भवन हे आज परिवर्तनाच्या आणि कष्टकरी जनतेच्या लढ्याचं एक प्रतिक बनून देशासमोर दिमाखात उभं राहिलं आहे.
मला वाटतं यापुढच्या काळात परिवर्तनाचा हा लढा कायम ठेवायचा असेल, इथली भ्रष्ट झालेली, कीडलेली व्यवस्था बदलायची असेल, तर केवळ मतपेटीवर लक्ष देऊन चालणार नाही. मतपेटीतून परिवर्तन घडवण्याचा एक चांगला पर्याय तुरुंग आणि फावडं याद्वारे बाबांनी आपल्या हाती दिली आहे. इतकंच नव्हे, तर गेल्या सात दशकातल्या कामातून त्यांनी एक प्रेरणादायी आर्दश समोर ठेवला आहे. विशेष म्हणजे आजही या वयात ते अशा कार्यासाठी मार्गदर्शन करायला तरुणाच्या उत्साहाने पुढे येतात. लोकहितकारी, परिवर्तनशील कार्याला ऊर्जा देणाऱ्या व ९१ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या दीपस्तंभाला सलाम..!
-विलास पाटील, पुणे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार व मनोविकास प्रकाशनाचे संपादक आहेत.)
ईमेल: patilvilas121@gmail.com
मोबाईल: 9423230529