पुणे: राज्यात यावर्षी सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज पुण्यातील ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. जूनअखेर ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसामध्ये खंड पडणार आहे. तर ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मात्र गेल्यावर्षी प्रमाणेच अतिवृष्टी होईल, अशी शक्यता व्यक्त केली आहे.
भारतीय हवामान विभागाने सोमवारी दुसरा अंदाज जाहीर केला, त्यानुसार 96 ते 104 टक्के पाऊस देशात पडण्याची शक्यता आहे. मात्र, डॉ.साबळे यांच्या मॉडेलनुसार राज्यात सरासरी 98 टक्के (कमी जास्त 5 टक्के) पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
डॉ.रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाचा अंदाज वर्तविण्यासाठी खालील बाबींचा समावेश आहे. त्यानुसार कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वा-याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी याबाबी तपासण्यात आल्या आहेत. जून आणि जुलै महिन्यात राहुरी, कोल्हापूर, अकोला, पडेगाव येथे पावसाचे मोठे खंड राहण्याची शक्यता आहे. तर दापोली, सोलापूर, पुणे, धुळे, निफाड, जळगाव,चंद्रपूर (शिदेवाही) व परभणी या भागात खंडाचा कालवधी कमी राहील म्हणजेच चांगला पाऊस राहणार आहे.
डॉ.साबळे यांच्या मॉडेलनुसार राज्याच्या विविध भागात पडणारा पाऊस: (मिलिमीटरमध्ये)
विदर्भ :- अकोला- 670, नागपूर- 939, चंद्रपूर-1167,
मराठवाडा विभाग- परभणी-798, कोकण- 3272, उत्तर महाराष्ट्र: नाशिक- 423, धुळे-470, जळगाव-627, असा आहे.
पश्चिम महाराष्ट्र:- कोल्हापूर -692, कराड-558, सोलापूर -532, पडेगाव- 352, राहुरी- 397, पुणे- 554