मुंबई: जर्मनी व फ्रान्समधील ३५० हून अधिक कंपन्या सध्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. त्यांनी उद्योगवाढीसाठी व नवीन गुंतवणूक आणण्यासाठी महाराष्ट्राचाच विचार करावा, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
इंडो-जर्मन चेंबर्स ऑफ कॉमर्स व इंडो-फ्रेंच चेंबर्स ऑफ कॉमर्सच्यावतीने आयोजित वेबिनारमध्ये श्री. देसाई बोलत होते. यावेळी मुंबईतील फ्रान्सच्या वाणिज्यदूत सोनिया बार्बरी, जर्मनीचे मुंबईतील वाणिज्यदूत डॉ. जे. मोरहार्ड आदी उपस्थित होते. यावेळी सिमेन्सचे अजय गुप्ता, अरुण कुमार, आशिष सिन्हा, मनोज आचार्य आदी उद्योजक सहभागी झाले होते.
श्री. देसाई म्हणाले की, लॉकडाऊनमुळे उद्योग क्षेत्राला फटका बसला आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु अशा परिस्थितीतही सुमारे ५२ हजार उद्योग सुरू झाले आहेत. त्यात सुमारे १३ लाखांहून अधिक कामगार रूजू झाले आहेत. उद्योग सुरू होऊनही कामगारांची उद्योगांना टंचाई जाणवत आहे. यासाठी औद्योगिक ब्यूरोची स्थापना केली आहे. याशिवाय विदेशी गुंतवणूकदारांसाठी उद्योग विभागाने चाळीस हजार हेक्टर जमीन राखीव ठेवली आहे. विविध परवान्यांचा जाच कमी करून महापरवाना दिला जाणार आहे. याशिवाय झटपट उद्योग सुरू करण्यासाठी रेडीमेड शेड देखील उद्योगांना दिले जाणार आहेत. जर्मनी व फ्रान्समधील कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राचाच विचार करावा, असे आवाहन श्री. देसाई यांनी केले.
दरम्यान, केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासन देखील लघु उद्योगांसाठी पॅकेज देणार आहे. यामुळे लघु, मध्यम उद्योगांना निश्चितच फायदा होईल. मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर पॅकेज जाहीर केले जाईल, असेही श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.