मुंबई: कोरोना चाचण्यांसाठी जालना येथे आरटी-पीसीआर प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नाला यश आले असून जालना जिल्हा रुग्णालयात ही प्रयोगशाळा सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात जालना येथे कोरोना चाचण्यांची सुविधा निर्माण होणार आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर या निर्णयामुळे जिल्हावासियांसह मराठावाडा भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती देतांना आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले की, जालना येथील रुग्णांचे नमुने औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठवावे लागतात. जालना जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि औरंगाबाद येथील प्रयोगशाळेवरील ताण पाहता जालना येथे प्रयोगशाळा होणे गरजेचे होते. त्यासाठी आता मान्यता मिळाली आहे.
या प्रयोगाशाळेसाठी अंदाजीत खर्च सुमारे १ कोटी रुपयांच्या आसपास असून त्याला मान्यता मिळाल्याने प्रयोगशाळा उभारणीस वेग येईल. आयसीएमआरच्या निर्देशानुसार प्रयोगशाळेची निर्मिती केली जाणार असून लागणारी यंत्रसामुग्री, मनुष्यबळाची उपलब्धता करून देण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
जालना जिल्ह्यात आरटी-पीसीआर प्रयोगशाळा सुरू होणार असल्याने कोरोना रुग्णांचे नमुने तातडीने मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांना तातडीने उपचार देखील मिळण्यास मोठी मदत होणार आहे. या प्रयोगशाळेमुळे भविष्यातही स्वाईन फ्लू, डेंग्यूसारख्या विषाणूसंसर्ग आजारांच्या चाचण्या करण्यासाठी मदत होणार असल्याने जालना जिल्हावासियांसाठी दिलासा देणारी बाब ठरणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.