# जिल्हाधिकारी उदय चौधरी यांचा औरंगाबादकरांशी विविध विषयांवर मनमोकळा संवाद.

 

औरंगाबाद: कोरोना परिस्थितीत घ्यावयाची खबरदारी, मिशन बिगीन अगेन, त्यातील सवलती, शेतकऱ्यांनी करावयाची पीक पेरणी, पीक कर्ज, ऑड इव्हन, सातबारा मिळविण्यासाठी महाभूमी अभिलेख, मुद्रांक कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालये, शैक्षणिक वर्ष, रोजगार हमी योजना, रुग्णांना उपचारासाठी अडचण येत असल्यास तक्रार करणे आदी विषयांवर मनमोकळेपणाने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी औरंगाबादकरांशी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी औरंगबादकऱ्यांच्या विविध प्रश्नांची जिल्हाधिकारी यांनी दखल घेत त्यांच्या शंकांचे निरसन केले.

मिशन ‍बिगीन असले तरी संपूर्ण लॉकडाऊन शिथील झालेले नाही. सवलतीचा योग्यप्रकारे लाभ घ्यावा. ग्रामीण भागातील जनतेने मास्कचा वापर करा. कोरोनाच्या परिस्थितीत जास्तीत जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. मास्क वापरल्यास संसर्ग प्रसारापासून बचाव होऊ शकतो. मास्कचा वापर, शारीरिक अंतर पाळणे, सॅनिटायजरचा वापर करणे अथवा स्वच्छ साबणाने वारंवार हात धुणे, पल्स ऑक्सीमीटरच्या वापर करण्याबाबत मागील फेसबुक लाईव्ह संवादामध्ये आवाहन केले होते. त्यास औरंगाबादकरांनी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. यापुढेही कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार टाळण्यासाठी या सवयी अंगीकारणे समाजाच्या हितासाठी आवश्यक आहेत.

मिशन बिगीनमध्ये दोन भाग केलेले आहेत. ग्रामीण भागात अटी व शर्तीसह सर्व त्या परवानगी दिलेल्या आहेत. 50 टक्के बस चालू आहेत. सर्व दुकाने सकाळी नऊ ते पाच वेळेपर्यंत चालू ठेवता येतील. मेडीकल दुकानांप्रमाणेच कृषी सेवा केंद्रे पूर्णत: चालू राहणार आहेत. तर दुसरा भाग हा शहरी भागांतर्गत आहे. यामध्ये शासनाच्या निर्देशाप्रमाणे औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत मनपा आयुक्तांनी विशेष आदेश काढण्यात आलेले आहेत. व्यायाम, जॉगिंग, सायकलिंग, गॅरेजेस, हार्डवेअर स्टोअर्स, प्लंबिंगचे व्यवसाय 3 जूनपासून सुरू करण्यात आलेले आहेत. पाच जूनपासून सर्व दुकाने सुरू होऊ शकतात. यामध्ये मॉल, कॉम्प्लेक्स,‍ सिनेमागृहे बंद असतील. गर्दीवर नियंत्रणासाठी ऑड इव्हन प्रमाणे अर्धे अर्धे दुकाने सुरू करावेत. आठ जूनपासून शहरातील सर्व खासगी कार्यालये अटीच्या अधीन राहून सुरू राहतील, असेही श्री. चौधरी यांनी सांगितले.

बाहेरगावी जाण्यासाठी पास आवश्यक आहे का ? या प्रश्नाचे उत्तर देताना श्री. चौधरी म्हणाले, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पोलिस विभागाकडून देण्यात येणाऱ्या पासची आवश्यकता आहे.
मागील आठवडाभरात 66 हजार शेतकरी बांधवांनी http://kcc.setuonline.com/ या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून पीक कर्जासाठी परिपूर्ण अर्ज दाखल केलेले आहेत. आतापर्यंत 21 हजार शेतकऱ्यांना 116 कोटीचे कर्ज मंजूर करण्यात आलेले आहे. ज्या शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता आहे, त्यांनी कर्ज मंजुरीसाठी ऑनलाईन स्वरुपात कर्ज सादर करावेत, असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

जिल्ह्यात अन्नधान्य पुरवठा मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. अन्नधान्य वितरणाबाबत तक्रारी असतील त्यांनी संबंधित तहसील कार्यालयात तक्रार दाखल करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्ह्यात एपीएल शेतकरी, प्राधान्य कुटुंब, अंत्योदय, केशरी शिधापत्रिका धारकांना दरमहा अन्न धान्य रास्त दरात उपलब्ध करून देतो. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रती व्यक्ती पाच किलो मे महिन्याचा मोफत तांदूळ देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात तीनही योजनेंतर्गत जवळपास 27 लाख 61 हजारांपेक्षा अधिक व्यक्ती आहेत. मे महिन्यामध्ये 23 लाख 64 हजार व्यक्तींना पाच किलो तांदूळ मोफत वितरीत करण्यात आलेले आहे. तसेच केशरी शिधापत्रिकाधारक असलेल्या 10 लाख 36 हजार व्यक्तींना 8 रुपये किलोप्रमाणे गहू आणि बारा रुपये किलोप्रमाणे तांदूळ देण्यात येत आहे. यामध्ये तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ प्रती व्यक्ती देण्यात येते आहे. ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही अशा जवळपास सव्वादोन लाख व्यक्ती जिल्ह्यात आहेत. यामध्ये शहरात पाच जूनपासून प्रती व्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ उपलब्ध करून देणार आहे, तर ग्रामीण भागात ही योजना सुरू झालेली आहे. शहरात वॉर्ड अधिकारी यांना सोबत घेऊन सव्वादोन लाख शिधापत्र‍िकाधारकांना अन्न धान्याचे वितरण करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले

कापूस शिल्ल्क असलेल्या व नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. नोंदणी व सर्वेक्षण केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात येणार असल्याची ग्वाहीही जिल्हाधिकारी यांनी देऊन शेतकरी बांधवांना आश्वस्त केले. तसेच जिल्ह्यातील मका खरेदी केंद्रावर रब्बीचा मका खरेदी करणार असल्याचेही ते म्हणाले.

निसर्ग चक्रीवादळ मुंबईहून नाशिकमार्गे निघून गेले आहे. या वादळामुळे जिल्ह्यात 30मि.मी पावसाची नोंद झालेली आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पावसाच्या आधारे पेरणी करू नये, पेरणीबाबत हवामान विभाग, कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार पेरणीचे नियोजन करावे. जेणेकरून दुबार पेरणीचे संकट आपल्यासमोर येणार नाही. सध्या जिल्ह्यात मुबलक प्रमाणात खते, बी-बियाणे आहेत. बियाणांचे 20 लाख पॅकेट प्राप्त झालेले आहेत. मे महिन्यात पाच ट्रेन भरून युरिआ आलेले आहे. हा युरिआ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न प्रशासनामार्फत करण्यात येत आहे, असेही जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले.

महा ई सेवा केंद्रे चालू नसतील, त्याबाबत प्रशासनास कळवावे. त्यबाबत संबंधितांना सूचना करण्यात येतील, असेही ते म्हणाले. परंतु त्याशिवाय पीक कर्जासाठी शासनाच्या आपले सरकारच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात, असेही त्यांनी सांगितले. तसेच ऑनलाईन सातबारा मिळविण्यासाठी https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करावा, असेही ते म्हणाले.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा. कोविड 19 या संसर्गजन्य आजाराव्यतिरिक्त इतर कोणत्याही आजारावर उपचार घेण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात कोणत्याही रुग्णास, नागरिकास कोणतीही अडचण अथवा बाधा निर्माण झाल्यास किंवा औषधोपचार घेण्यास काहीही अडचण निर्माण झाल्यास संबंधिताने abdcoll.hospitalgrievances@gmail.com या मेलवर तक्रार दाखल करावी, असेही आवाहन त्यांनी केले.
कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये यासाठी जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात जिल्ह्यात तयारी करण्यात आलेली आहे. आरोग्य विभागातील सर्व कोविड योद्धे यांना विमा कवच उपलब्ध आहे. रास्त भाव दुकानावर पारदर्शक पद्धतीने धान्याचे वितरण व्हावे यासाठी एका शासकीय कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असेही त्यांनी प्रशनांचे उत्तरे देताना सांगितले. त्याचबरोबर लाईव्हच्या माध्यमातून आलेल्या सूचनांचा प्राधान्याने विचार करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

वटपोर्णिमेसाठी सोशल डिस्टंसिंग पाळत हा सण साजरा करावा. औरंगाबादच्या 1113 जण ठणठणीत बरे झालेले आहेत. कोरोना हा जीवघेणा आजार केवळ दोन टक्क्यांसाठी आहे. कोरोनाची भिती सावधरित्या बाळगत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *