नवी दिल्ली: यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने कोविड -19 महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज एका विशेष बैठक घेतली. आता केंद्र सरकारने आणि राज्य सरकारांनी टाळेबंदीमध्ये मोठ्या प्रमाणावर शिथिलता आणली आहे, हे लक्षात घेवून लोकसेवा आयोगाने आपल्या भरती चाचण्यांचे सुधारित वेळापत्रक यूपीएससीच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागरी सेवा परीक्षा-2019 च्या उर्वरित उमेदवारांची व्यक्तिमत्व चाचणी (पर्सनॅलिटी टेस्ट) येत्या 20 जुलैपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णयही आयोगाने घेतला. यासंबंधी उमेदवारांना स्वतंत्रपणे व्यक्तिशः माहिती देण्यात येणार आहे.
पीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये ईओ / एओ या पदांच्या भरतीसाठी 4 ऑक्टोबर 2020 रोजी परीक्षा घेण्यात येणार होती. आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 2021 साठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे नवीन वेळापत्रक तसेच भरती चाचणीच्या नव्या तारखा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.