पुणे: मान्सून पुढे सरकण्यास पोषक स्थिती असून कर्नाटक आणि तमिळनाडूच्या आसपास थांबलेला मान्सून गतिमान होऊ लागला आहे. शनिवारी मान्सूनने आगेकूच करीत संपूर्ण दक्षिण कर्नाटक, तमिळनाडूचा उर्वरित भाग, पाॅडिचेरी, बंगालच्या उपसागरातील मध्य, पूर्व आणि पश्चिम भागापर्यंत मजल मारली. दरम्यान, येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत धडकणार आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागरातील पूर्व मध्य भागापासून ते अंदमानच्या समुद्रापर्यंत हवेच्यावरच्या भागात चक्रीय स्थिती आहे. या स्थितीमुळे मान्सून पुढे सरकण्यास पोषक वातावरण आहे. शुक्रवारी तो कर्नाटकच्या किनारपट्टीवर स्थिर होता. शनिवारी मात्र आगेकूच करीत तमिळनाडूनचा बहुतांश भाग काबीज करून दक्षिण कर्नाटक, पर्यंत धडकला आहे. तर बंगालच्या उपसागरातील पूर्व पश्चिम आणि मध्य भाग पार केला आहे. दरम्यान, येत्या दोन ते तीन दिवसात बंगालच्या उपसागरातील मध्यपूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. त्याच्या परिणामामुळे मान्सून संपूर्ण कर्नाटक पार करून आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी, रॉयलसीमा, बंगालच्या उपसागरातील बराचसा भाग व्यापणार आहे.
कोकण, विदर्भात हलक्या पावसाची शक्यता: विदर्भावर सध्य चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे राज्यात 9 जूनपर्यंत मेघगर्जना, सोसाट्याचा वा-यासह विजांच्या कडकडाटात मध्यम स्वरूपाचा पाऊस मध्यमहाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात हजेरी लावणार आहे.