पुणे: महावितरणकडे मनुष्यबळ किंवा साहित्याची कोणतीही कमतरता नाही. दुरुस्ती खर्च व साहित्य खरेदीसाठी स्थानिक अधिकार दिले आहेत. त्यामुळे ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या पुणे जिल्ह्याच्या दुर्गम अतिदुर्गम भागातील शेवटच्या घराचा वीजपुरवठा पूर्ववत होईपर्यंत वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचा जलद वेग कायम ठेवा, असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.
‘निसर्ग’ चक्रीवादळाचा वीजयंत्रणेला तडाखा बसल्यानंतर वीजपुरवठ्याची स्थिती आणि दुरुस्तीच्या कामांबाबत शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी पुणे, कोकण, नाशिक, कल्याण, भांडूप परिमंडलांचा आढावा घेतला. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी चक्रीवादळाच्या तडाख्याने बाधित झालेली वीजयंत्रणा, दुरुस्ती मोहीम व वीजपुरवठ्याची सद्यस्थिती याबाबत सविस्तर माहिती दिली.
ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले, कोरोनाच्या संकट काळातच चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या उपाययोजना करून चक्रीवादळाच्या बाधित भागामध्ये अत्यावश्यक असलेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी सर्वाधिक प्राधान्य देण्यात यावे. सध्या उपलब्ध असलेले सर्व साहित्य या वादळग्रस्त भागासाठी वापरण्यात यावे. दुरुस्ती खर्च किंवा साहित्य खरेदीसाठी स्थानिक अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास पेंडींग अॉर्डरची जलद पूर्तता करून साहित्य उपलब्ध करण्याचे आदेश त्यांनी दिले. यासोबतच चक्रीवादळामुळे नादुरुस्त झालेली वीजयंत्रणा व दुरुस्तीनंतर पूर्ववत झालेल्या वीजपुरवठ्याची दैनंदिन स्थिती याबाबत उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना तसेच संबंधित खासदार व आमदार यांना सुद्धा अवगत करण्यात यावे, असे आदेश ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले.
या आढाव्यामध्ये पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी सांगितले, की प्रामुख्याने खेड, मावळ, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील वीजयंत्रणेला चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. वादळादरम्यान सावधगिरीचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र, वीजयंत्रणेची मोठी पडझड झाल्यामुळे या चार तालुक्यातील 47 उपकेंद्र बंद पडले होते. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 2420 उच्च व लघुदाबाचे वीजखांब नादुरुस्त झाले आहेत. 389 उच्चदाब वीजवाहिन्या बंद पडल्या. वादळ व पावसाचा वेग ओसरल्यानंतर युद्धपातळीवर दुरुस्ती काम सुरु करण्यात आले. या भागामध्ये सध्या 950 अभियंते व कर्मचारी, 19 कंत्राटदारांचे 550 कर्मचारी तसेच पुण्यातून पाठविण्यात आलेले अभियंता व कर्मचाऱ्यांची 19 पथके दुरुस्तीची कामे करीत आहेत. प्राथमिक स्वरुपात सध्या 600 लोखंडी व 2400 सिमेंट खांबांचा व 35 किलोमीटर वीजतारांचा पुरवठा करण्यात आला आहे. आणखी वीजखांब व इतर साहित्य पाठविण्यात येत आहे. शनिवारपर्यंत 358 वीजवाहिन्या कार्यान्वित करून वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. मात्र, दुर्गम व मोठी झाडे पडलेल्या भागातील 31 वीजवाहिन्या अद्याप नादुरुस्त आहेत. या उर्वरित सर्व वीजवाहिन्या रविवार, 7 जूनपर्यंत कार्यान्वित होतील. त्यानंतर वाड्या-वस्त्या किंवा एक-दोन घरांचा वीजपुरवठा खंडित असल्याच्या तक्रारींचे लघुदाब वाहिन्यांच्या दुरुस्तीद्वारे निवारण करण्यात येणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात चक्रीवादळामुळे विविध भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. या दोन्ही शहरांमध्ये सर्व भागातील वीजपुरवठा सुरळीत झाल्याचे मुख्य अभियंता श्री. तालेवार यांनी सांगितले.
या आढावा बैठकीमध्ये कोकण प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके, महावितरणचे संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू, नागपूर प्रादेशिक संचालक (प्र.) सुहास रंगारी, कार्यकारी संचालक अरविंद भादीकर व संबंधित परिमंडलांचे मुख्य अभियंत्यांची उपस्थिती होती.