औरंगाबाद: गेल्या अडीच महिन्यांपासून लाॅकडाऊनमुळे शहरातील लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. शाहीर आणि ज्येष्ठ पत्रकार डाॅ. शेषराव पठाडे यांनी ही बाब निदर्शनास आणून देताच सिडकोतील करुणा ग्रंथवाचक मंडळाने वाघ्या-मुरळी, तमाशा-लोकनाट्यातील ढोलकी वादक, पेटी वादक गायक कलावंतांना गहू-तांदळसह किराणा सामानाचे कीट वाटपकेले.
सिडकोतील करुणा ग्रंथवाचक मंडळाच्या वतीने कोरोनाच्या भीषण संकटात समाजातील गोरगरीबांसह हातावर पोट असणार्यांना मदत केली जात आहे. ज्यांना मदत पोहोचवणे अशक्य आहे, अशा काही लोककलावंतांच्या खात्यांवर रोख स्वरुपात रक्कमही जमा केल्याचे औदार्य या मंडळाने दाखवले आहे. करुणा ग्रंथवाचक मंडळाचे सचिव राजेंद्र वाणी, आॅडिटर संजय वाणी आणि त्यांच्या सहकार्यांनी आर्थिक मदतीसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
नंदनवन काॅलनीतील लोकरंजन लोककला प्रतिष्ठानचे हर्मोनियमवादक सिद्धार्थ ढाले, ढोलकीवादक किशोर जोगदंड, गायिका रेखा कांबळे, सातारा (खंडोबाचे) येथील जयमल्हार वाघ्या-मुरळी मंडळाचे सुषमा मिसाळ, वंदना एंडोले, विमल हिंगे आदींना महिनाभर पुरतील एवढ्या जीवनावश्यक वस्तू मिळाल्याबद्दल त्यांनी राजेंद्र वाणी, संजय वाणी, डाॅ. शेषराव पठाडे यांचे आभार व्यक्त केले.