औरंगाबाद: सरकारने थेट अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करत सर्वसामान्य लोकांच्या हातात थेट रक्कम द्यावी. तरच त्यांची क्रयशक्ती वाढेल आणि बाजारातील मागणी व पुरवठाही वाढेल. पर्यायाने अर्थव्यवस्थाला गती मिळेल. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्थव्यवस्था, अार्थिक धोरण व सद्य परिस्थितीवर संवाद साधला. निमित्त होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या संवाद सत्राचे. या संवाद सत्रात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी झूमअॅपद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना पृथ्वीराज चव्हाण यांनी सविस्तर उत्तरे दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने काय करायला हवे याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना प्रेमळ सल्ला दिला. अभ्यास करा, देशातील राजकीय, आर्थिक, धोरणावर स्वतःचे मत बनवायला शिका. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. यावेळी जनसंवाद व वृत्तपत्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. दिनकर माने व विभागातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
राज्यपाल नियुक्त सदस्य डॉ. जितेंद्र देहाडे यांच्या सहकार्याने हा फेसबुक संवाद घेण्यात आला. कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना फेसबुक संवाद गेल्या महिन्यापासून सुरू आहे. आजपर्यंत खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासह मान्यवरांनी या संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला आहे.