पुणे: कर्नाटकात स्थिर झालेल्या मान्सूनने गती घेतली असून, अरबी समुद्रात पोषक वातावरण निर्माण झाले आहे. तो कारवारमार्गे गोवा आणि कोकण भागात बुधवार, १० ते ११ जूनपर्यंत दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
निसर्ग वादळाने संपूर्ण बाष्प शोषल्याने मान्सून लांबला आहे. या वादळाच्या प्रभावाने तो कर्नाटकात स्थिर झाला होता. पण आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तो २४ तासात गतिमान होईल. कर्नाटक, रॉयलसीमा, तमिळनाडू, बंगालचा दक्षिण व उत्तर भागात तो वेगाने सक्रिय झाला आहे. अरबी समुद्रात देखील पोषक वातावरण निर्माण झाल्याने यंदा तो गोवा व कोकणात चार ते दिवस उशिरा म्हणजे १०ते ११ जूनपर्यंत येऊ शकतो.
राज्यात १० व ११ जून रोजी सर्वत्र पाऊस: मान्सूनचे वारे गतिमान झाले असून त्याचा वेग ताशी ४५ ते ५५ किमी. वेगाने येत आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात १० व ११ जूनला मुसळधार पाऊस पडेल. तसेच विदर्भातही चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने या दोन दिवसात जोरदार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.