# राजे, तुम्ही होता म्हणून आम्ही आहोत… -सुरेंद्र कुलकर्णी.

 

राजे, तुमच्या राज्याभिषेकाचाच नाही तर त्रेपन्न वर्षाच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा सोहळा वर्षानुवर्षे साजरा करायला हवा…देवीने तुम्हाला भवानी तलवार दिली, मोगली, सुलतानी अन्यायाला कापून काढणारी तलवार चालवण्यासाठी मनगटातील धैर्यामागे जिजाऊंनी दिलेलीच ओतप्रोत प्रेरणा होती, ह्यावर श्रद्धा आहे.

कशी उरात धडकी भरत असेल गड आणि किल्ल्यांच्या जेव्हा शस्त्रसंपन्न असे कैक सहस्त्रांचे पायदळ, घोडदळ स्वराज्यावर वेळोवेळी चालून येत असेल तेव्हा..! कसा थरकाप उडत असेल शेतकरी, आया बहिणी आणि इथल्या दगडधोंड्याच्या मनामनांत! थेट प्राणावरच येणाऱ्या शत्रूला कसे थोपवले असेल शिवभक्तांनी!जीवावर उदार होऊन काय आणि कशा युक्त्या-प्रयुक्त्या, डावपेच, आखले असतील? कधी बळाचा, कधी वेगाचा कसा वापर केला असेल? कधी दबा धरून बसून हल्ला करण्याचे तर कधी छातीची ढाल करून अंगावर घेण्याचे, कधी उजेडात लपण्याचे तर कधी अंधारात प्रकट होण्याचे किती प्रसंग शिवरायांनी ठेवलेले ध्येय गाठण्यासाठी आणि गाठलेले राखण्यासाठी शिवभक्तांनी झेलले असतील? किती हेरांनी कुठल्या-कुठल्या काट्यातील आडवाटा तुडवत, सरपटणारे जीव अंगावर घेत, उपाशी तापाशी राहत पाहिजे ती नेमकी माहिती शिवरायांना दिली असेल…! कसे शिवरायांच्या एका शब्दासरशी मोगलांचे साम्राज्य अंगावर घेण्यासाठी मावळे सज्ज झाले असतील?

या साऱ्या प्रश्नाचे उत्तर एकच आणि ते म्हणजे या सर्वांच्या हृदयांत, मेंदूत, मनगटांत, तलवारीच्या धारेवर, भल्यांच्या टोकावर आणि गनिमवार झेलणाऱ्या ढाली- पागोट्यावर म्हणजेच रोमारोमांत शिवरायांनी उभे केलेले हिंदवी स्वराज्य!

कसे मुरारबाजी देशपांडेने दिलेरखानाच्या प्रलोभनांना घोड्याच्या टापाखाली चिरडले असेल? कसा जिवा महाल सय्यद बंडाचा वार झेलायला अवतरला असेल, पाठलाग करत अंगावर येत असणारा चवताळलेला गनिम मागे ठेवून ‘कैक बाजी गेले तरी चालतील, पण राजे तुम्ही जगले पाहिजे’ असे बाजीच्या तोंडून बाहेर पडले असेल, कसे तानाजी, सूर्याजी, शेलारमामा अंगणात आलेले कार्य बाजूला ठेवून कड्याकपाऱ्यांनी काळोखात काही’शे’ घेऊन कोंढाण्यावर गेले असतील..कसे कुणी शिवाजी महाराज ‘बनून’ सिद्दीच्या शामियानात मृत्यूला कवटाळायला गेले कसे फुलादखनाच्या तावडीतून मदारी-हिरोजी सुटले असतील? किती उदाहरणे, किती प्रसंगांचे तलवारीचे खणखणाट आमच्या मनात घुमत आहेत…! रयतेसाठी अहोरात्र झिजलेले हे सश्रद्धता, निश्चय, स्वाभिमान, अदम्य पराक्रम, शौर्य, प्रसंगावधान, रणनीती कौशल्य, न्याय या गुणांचे दिग्विजयी विजिगुषी दैवत हे महाराष्ट्राला लाभले ज्यायोगे हिंदवी स्वराज्य निर्माण झालेच झाले परंतु त्याचबरोबर शिवचरित्राच्या प्रत्येक प्रसंगातून स्फूर्तीचे अजरामर झरे येणाऱ्या पिढ्यांसाठी निर्माण झाले..!
जय जिजाऊ.. जय शिवराय..!
-सुरेंद्र कुलकर्णी, पुणे
लेखक उद्योजक आहेत
मो 9767202265
surendrakul@rediffmail.com

4 thoughts on “# राजे, तुम्ही होता म्हणून आम्ही आहोत… -सुरेंद्र कुलकर्णी.

  1. सुरेंद कुलकर्णी, अप्रतिम लेख आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *