मुंबई: वॉर्ड बॉईज, परिचारिका हे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आघाडीवर असणारे आपल्या समाजातील कोरोना योद्धे आहेत आणि रुग्णांसोबत त्यांना सर्वात जास्त काळ व्यतीत करावा लागतो. त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियरिंगमध्ये पदवी घेतलेल्या प्रतीक तिरोडकरने कोरो रोबोटची निर्मिती केली आहे. हा संवाद साधणारा रोबो सध्या कल्याण येथील होली क्रॉस रुग्णालयात कार्यान्वीत करण्यात आला आहे.
कोरो रोबोट नर्सेस आणि वार्ड बॉईज यांच्या संपर्काची गरज नाहीशी करतो. तो रुग्णांना अन्नपाणी आणि औषधी पुरवण्याचे काम करतो कॅमेर्याच्या मदतीने तो रुग्णांशी संवादही साधू शकतो. यात एक डिस्प्ले स्क्रीन, कॅमेरा आणि एक स्पीकरदेखील आहे. तसेच त्यात सॅनिटायझर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चार तासांच्या चार्जिंगनंतर सहा ते आठ तास तो कार्यरत राहील. इंटरनेटच्या माध्यमातून कार्यान्वित केला जाणार असल्याने त्याला अंतराचे बंधन नाही. अन्नपदार्थ, औषधी, फळे ठेवण्यासाठी ट्रेची रचना यामध्ये करण्यात आली आहे. साठवणुकीची व्यवस्थाही आहे.
पाणी, औषधी, अन्न देणाऱ्या ट्रेमध्ये सेन्सर्स लावण्यात आले असून ते स्वयंचलितपणे हाताच्या हालचालीवर काम करतात. या रोबोमध्ये एलईडी लाईटच्या मदतीने प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचे रात्री संचालन करणेदेखील शक्य होते. यावर एक छोटेसे संगणकवजा उपकरणही लावण्यात आले आहे ज्यातून छोटी-मोठी कामे तसेच मनोरंजनाची सोय करण्यात आली आहे.
लॉकडाऊनच्या काळात रोबो बनवण्यासाठीची उपकरणे मिळणे अवघड झाले असताना प्रतीकने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मदतीने हा रोबो आकारास आणला त्यासाठी त्याला त्याच्या तीन ते चार सहकाऱ्यांची मदत झाली. रोबोटचे पार्ट बनवणारी दुकाने बंद असल्याने त्यांनी स्वतः ते पार्ट बनवले
पंधरा ते वीस दिवसात बनलेला हा प्रायोगिक रोबो सध्या कल्याण येथील होली क्रॉस रुग्णालयात सेवा देतो आहे. प्रतीकला विश्वास आहे की तो दर आठवड्याला दोन ते तीन रोबो बनवू शकतो. या रोबोच्या संचलनासाठी प्रतीक आणि त्याच्या टीमने एक स्पेशल अॅप बनवले आहे जे इंटरनेटचा वापर करून या रोबोचे दूर ठिकाणावरून संचालन देखील शक्य बनवते. अधिक माहितीसाठी प्रतीक तिरोडकर यांना 8097141179 या नंबरवर संपर्क करता येईल.