पुणे: पोषक वातावरणामुळे मान्सूनची आगेकूच वाढली असून, 48 तासात तो गोवामार्गे कोकणात दाखल होणार आहे. दरम्यान, कर्नाटकपासून निघालेला मान्सून सोमवारी कारवारपर्यंत पोहचला आहे. 14 जूनपर्यत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे.
मध्य पूर्व बंगालच्या उपसागरात 48 तासात कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. या पट्ट्याची तीव्रता पुढील दोन दिवसात वाढणार आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनची आगेकूच होण्यास अत्यंत पोषक वातावरण आहे. त्यामुळेच मान्सून जोरदारपणे पुढे आगेकूच करीत आहे. मध्य अरबी समुद्र, गोवा, कोकण, कर्नाटक, रॉयलसीमा, तमिळनाडूचा उर्वरित भाग, आंध्रप्रदेशची किनारपट्टी, तेलंगणा, बंगालच्या उपसागरातील मध्य, उत्तर भाग, तसेच सिक्कीम, ओडिशा, गॅगस्टीक, पश्चिम बंगाल या भागातही 48 तासात मान्सून दाखल होणार आहे. ही माहिती पुणे येथील हवामान विभागाने दिली.