# औरंगाबादच्या कला महाविद्यालयासह चार शासकीय कला महाविद्यालयांतील अध्यापक पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर.

 

मुंबई: कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय-औरंगाबादसह चार शासकीय कला महाविद्यालयांकरिता अध्यापकीय पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

सर ज. जी. कला महाविद्यालय-मुंबई, सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालय-मुंबई, शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय-नागपूर आणि शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय-औरंगाबाद  अशी चार शासकीय कला महाविद्यालये कार्यरत आहेत.

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (ए.आय.सी.टी.इ.) अधिनियम-1987 नुसार दृश्य कलेशी संबंधित अभ्यासक्रम तंत्र शिक्षण म्हणून घोषित करण्यात आले आहेत. कला महाविद्यालयांकरिता ए.आय.सी.टी.इ.कडून निकष व मानके विहित करण्यात आली आहेत. या निकष व मानकांनुसार शासकीय कला महाविद्यालयांकरिता शिक्षकीय पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करणे आवश्यक होते. त्यामुळे या चार शासकीय महाविद्यालयांकरिता ए.आय.सी.टी.इ.कडून विहित करण्यात आलेले निकष, मानके तसेच, वेतनश्रेणीमध्ये, प्राचार्य, प्राध्यापक, सहायोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, विभाग प्रमुख आणि अधिव्याख्याता या संवर्गातील 159 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शासकीय कला महाविद्यालयांमध्ये जुन्या आकृतीबंधानुसार अध्यापकांची 135 पदे मंजूर आहेत. या पदांवर कार्यरत असलेले अध्यापक जसजसे निवृत्त होतील तसतशी ही पदे सुधारित आकृतीबंधानुसार भरण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *