अंबाजोगाई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंडे यांचा ड्रायव्हर, स्वीय सहाय्यकासह पाच कर्मचारीही बाधित असल्याचे समोर आले आहे. मुंबईत काल त्यांची कोरोना तपासणी केली असता रात्री त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.
विशेष म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत धनंजय मुंडे सहभागी झाले होते. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली होती. या दोन्ही मंत्र्यांनी कोरोनावर मात केली.
दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये ३६०७ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १५२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. मागील २४ तासांमध्ये १५६१ रुग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ४६ हजार ७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर कोरोना रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ९७ हजार ६४८ झाली आहे. २४ तासांमध्ये ३६०७ रुग्ण आढळणं ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे असंही महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे.
बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहनः. ज्या व्यक्ती मागील चार दिवसांत पालकमंत्री, त्यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे पी.ए. यांच्या जवळच्या संपर्कात आल्या किंवा कागदपत्रांची देवाणघेवाण केलेली अशांनी, त्यांच्या संपूर्ण कुटुंबासमवेत २८ दिवस होम क्वाॅरंटाईन होऊन काटेकोरपणे काळजी घ्यावी आणि कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयात संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.