पुणे: अनुकूल स्थितीमुळे मान्सूनची आगेकूच सुरूच असून, शुक्रवारी विदर्भाचा बहुतांश भाग मान्सूनने व्यापला आहे. पुढील 48 तासात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पोहचेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, 24 तासात कोकण, मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरातील तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता उत्तर आध्रंप्रदेशच्या किनारपट्टीपासून ओडिशाच्या किनारपट्टीपर्यंत आहे. या पट्ट्याची तीव्रता चांगलीच वाढली आहे. त्यामुळे मान्सूनने गुरूवारी कोकणासह मध्यमहाराष्ट्र, ते अगदी मराठवाड्यापर्यंत मजल मारली होती. शुक्रवारी देखील मान्सूनची वाटचाल जोरदार राहिली आहे. मराठवाड्यापर्यंत पोहचलेल्या मान्सूनने विदर्भापर्यंत मजल मारली आहे. याबरोबरच तेलंगणा, छत्तीसगड, आसाम, मेघालय, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमपर्यंत मान्सूनने धडक मारली आहे. येत्या 48 तासात मुंबई, मध्यअरबी समुद्र, छत्तीसगड, दक्षिण गुजरात, दक्षिण मध्यप्रदेश, झारखंड, आणि बिहारपर्यंत पोहचणार आहे.