अंबाजोगाई: सोमवारी अंबाजोगाईत कोरोना विषाणू निदान प्रयोगशाळेचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. मात्र, या कार्यक्रमाचे उद्घाटक सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे कोरोनाने प्रभावित झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच क्वारंटाईन करण्यात येणार आहे. एकूण ६५ जणांना यासंदर्भातील पत्र बजावण्यात येणार आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांना सध्या मुंबईतील ब्रीच कॅन्डी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
प्रयोगशाळेचा लोकार्पण कार्यक्रम पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या कार्यक्रमास आमदार, अधिष्ठाता, महसूल आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, पत्रकार, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी देखील हजेरी लावली होती. परंतु या शासकीय कार्यक्रमाला खा. प्रीतम मुंडे आणि आ. नमिता मुंदडा यांना डावलल्याने राजकीय वादाला तोंड फुटले होते. या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन झाल्याचाही आरोप आ. मुंदडा यांनी केला होता. हा वाद अद्याप शमला नसतानाच या कार्यक्रमाच्या उद्घाटकांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
संभाव्य संसर्ग रोखण्यासाठीचा खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या लोकांची यादी तयार करण्याचे काम हाती घेतले होते. समारंभप्रसंगी काढण्यात आलेल्या छायाचित्रातून उपस्थितांची नोंद घेण्यात आली. प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या ६५ जणांची यादी तयार करण्यात आली आहे. यातील अनेकांनी स्वतःहून डॉक्टरांशी संपर्क साधून क्वारंटाईन करून घेतले आहे. तर, उर्वरित व्यक्तींना क्वारंटाईन करण्याचे आदेश आरोग्य विभागाच्या वतीने बजावण्यात येणार आहे.
दरम्यान, अंत्यविधीसाठी केवळ २०, लग्न समारंभासाठी ५० व्यक्तींना परवानगी देणाऱ्या प्रशासनाने शासकीय कार्यक्रमात एवढी गर्दी कशी काय होऊ दिली याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.