अंबाजोगाई: अंबाजोगाई शहरातील सोने-चांदीचे व्यापारी शिवानंद हरंगुळे यांचा मुलगा सुमीत हरंगुळे याने पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एनडीए) येथून खडतर असे प्रशिक्षण पूर्ण करून सैन्य दलात लेफ्टनट पदावर नियुक्त होण्याचा मान मिळवला आहे.
सुमीत याचे पहिली ते पाचवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण अंबाजोगाई येथील योगेश्वरी नूतन विद्यालयात झाले आहे. सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण सातारा येथील शासकीय सैनिकी स्कूल येथे झाले. त्यानंतर सुमीतने पुण्यातील एनडीए व डेहराडून येथील प्रशिक्षण केंद्रात एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून हा बहुमान मिळवला आहे. त्याची भारतीय सैन्यदलात सिक्कीम येथे लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे. तो लवकरच सिक्कीम येथे रूजू होणार आहे. सुमीतने मेहनत, जिद्द, चिकाटीने स्वबळावर कमावलेल्या लेफ्टनंटपदाने अंबाजोगाईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सुमितच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.