सध्या महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शासन व राज्यातील आरोग्य यंत्रणा त्यांच्या परीने युद्धपातळीवर कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी विविध पातळ्यांवरून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. अनेकदा सोशल मीडियावरून व विविध पातळ्यांवरून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काम सुरू आहे.
हे काम करत असताना राजकीय नेत्यांनी स्वत: काळजी घेणे हे महत्वाचे आहे. केवळ जनतेला आवाहन करून भागणार नाही तर आपणही आपल्या आरोग्याची काळजी घेणे तेवढेच गरजेचे आहे. कोरोना हा विषाणू गरीब-श्रीमंत, सर्वसामान्य राजकीय पुढारी किंवा अधिकारी असा भेदभाव न करता त्याचा कोणालाही संसर्ग होऊ शकतो, यासाठी सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी आता केवळ घरात बसून चालणार नाही, त्यासाठी आता शासकीय प्रशासकीय कामे झाली पाहिजेत पण हे करत असताना काळजी घेणे आवश्यक आहे. यामध्ये थोडी जरी चूक झाली तरी या विषाणूची बाधा होऊ शकते.
सुरूवातीला मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. त्यांनी स्वत: क्वारंटाईन होऊन कोरोनाशी मुकाबला करत त्यावर मात केली.
काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने ते मुंबईत होते. निवडणूक पार पडल्यानंतर ते नांदेडला गेले. तेथे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तपासणी केली असता त्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांनीही कोरोनाशी दोन हात करत त्यावर मात केली. दरम्यान, त्यांना व्यवस्थित औषधोपचार मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी मुंबईला बोलावले होते. त्यासाठी एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात येणार होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना नांदेडहून १२ तास प्रवास करून बाय रोड मुंबई गाठावी लागली होती. अशोक चव्हाण यांना कोरोनाची बाधा झाल्याचे कळताच ते लवकर बरे व्हावेत, यासाठी राज्यातील त्यांच्या चाहत्यांसह नांदेडमधील कार्यकर्त्यांनी आप-आपल्या परीने ईश्वराकडे प्रार्थना केली. कोणी नवस-सायास केले. ते बरे झाल्याने आता कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील तिसरे सहकारी धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. धनंजय मुंडे हे सोमवारी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात नव्याने सुरू झालेल्या विषाणू प्रयोगशाळेच्या उद्घाटनासाठी गेले होते. तेथे त्यांचा अनेकांशी संपर्क आला होता. त्यामुळे त्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. तेही सध्या कोरोनाचा मुकाबला करत आहेत. यातून ते लवकरच नक्की बरे होतील, यात शंका नाही. मात्र, रोग झाल्यावर इलाज करून घेण्यापेक्षा रोगाचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घेणे हे कधीही चांगले. यासाठी भविष्यात लोकहिताची कामे करत असताना सर्वच नेत्यांनी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे.
राजकीय क्षेत्रात काम करत असताना सर्वसामान्य लोकांसह अनेकांचा संपर्क येत असतो. मात्र, सध्या राजकीय नेत्यांनी पुरेशी काळजी घेऊन कामे करावीत. समाजाचे हीत महत्वाचे असले तरी स्वत: चे आरोग्य सांभाळणे हेही तितकेच महत्वाचे आहे. कारण तुम्ही चांगले व निरोगी असाल तर तुम्हाला जनतेची सेवा करता येईल. कारण समाजाचे हीत पाहत असताना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. कारण तुम्ही समाजाचे पोशिंदे आहात तुम्ही सुदृढ राहिलात तर समाजाचे भले होईल.
-विलास इंगळे, संपादक
maharashtratoday.live
ईमेल: vilas.single@gmail.com
मोबाईल: 9422210423