अंबाजोगाई: अंबाजोगाई येथील प्रख्यात नाट्यकर्मी, दिग्दर्शक व स्वाराती कला व वाणिज्य महाविद्यालयातील सेवानिवृत्त नाट्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. केशव देशपांडे (वय72) यांचे आज पहाटे निधन झाले. सत्तरीच्या दशकातले नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एन.एस.डी.) पासआउट. इब्राहिम अल्काझींचे शिष्य. उत्तम रंगकर्मी. शेतकरी संघटनेचे कट्टर पुरस्कर्ते, कै. शरद जोशींचे निकटवर्ती अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मूलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
कळंब तालुक्यातील (जि. उस्मानाबाद) येथील मूळ रहिवासी असलेले प्रा. केशव देशपांडे यांनी अंबाजोगाई येथील स्वाराती कला व वाणिज्य महाविद्यालयात सुरु करण्यात आलेल्या नाट्यशास्त्र विभागाचे पहिले विभाग प्रमुख म्हणून अनेक वर्षे काम केले. त्यांनी आपल्या ज्ञानदानासोबतच रंगभूमीची असलेली नाळ तुटू दिली नव्हती. नाट्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणून काम करीत असतांना त्यांना अनेक नाटकात मुख्य भूमिका केल्या, तसेच अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले. आपल्या सेवाकाळात त्यांनी अनेक कलाकार, दिग्दर्शक घडवले. महाविद्यालयात एक विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. यासोबतच शहरातील सामाजिक सांस्कृतिक कार्यातील त्यांचा सहभाग ही मोलाचा राहिला होता. अंबाजोगाई शहराची नाट्यसंस्कृती जोपासण्यात आणि वृध्दींगत करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
प्रा. केशव देशपांडे यांची प्रकृती गेली अनेक दिवसांपासून क्षीण होत चालली होती. वृध्दापकाळाच्या आजाराने ते खचले होते. पुणे येथे मुलाकडे राहत असलेले प्रा. केशव देशपांडे गेली पंधरा दिवसापूर्वीच स्वाराती महाविद्यालयासमोर वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने बांधलेल्या आपल्या घरात सहकुटुंब परत आले होते. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला.