पुणे: असंघटित क्षेत्रातील कामगार हे बहुजन समाजाचे असून ते दुर्लक्षित आहेत आणि केवळ तीन टक्क्यांचंच राजकारणात प्राबल्य आहे. त्यामुळे सद्यस्थितीत या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना सध्याच्या कोरोनाच्या काळात आधार देणे महत्त्वाचे आहे, असे मत वीज वितरण कंपनीतील अतिरिक्त कार्यकारी अभियंता तथा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डाॅ. संजय घोडके यांनी रविवारी व्यक्त केले.
फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी लॉकडाऊन काळात महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन निभावत असलेले सामाजिक दायित्व, या विषयावर संवाद साधला. संजय घोडके यावेळी म्हणाले की, कोरोना संसर्गामुळे बेरोजगारी वाढली आहे. याचा सर्वाधिक फटका हा रोजंदारी कामगार व असंघटित क्षेत्रातील कामगारांना बसला आहे. त्यांना सध्या मदतीची गरज आहे. यासाठी समाजातील अन्य घटकांनीही पुढे येणे गरजेचे आहे. यावेळी संजय घोडके यांनी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना करत असलेल्या कार्याची माहिती दिली. याबरोबरच लाॅकडाऊन काळात संघटनेने केलेले सामाजिक कार्य, गरजूंना केलेली मदत यावरही त्यांनी प्रकाश टाकला.