जालना: जालना शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला असून आणखी नवीन 14 संशयितांचे अहवाल आज सोमवारी पहाटे पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची एकूण संख्या 291 झाली आहे.
जिल्हा रुग्णालयास 14 संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. मुंबई येथून परतलेल्या जालना येथील राज्य राखीव दलातील चार जवानांचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांचे निवासस्थान असलेल्या जालना शहरातील भाग्यनगर या उच्चभ्रू भागातील दोन जणांचा बाधितामध्ये समावेश आहे. काद्राबादमध्ये आणखी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
वाल्मीकनगर दर्गा वेस, शंकरनगर, समर्थनगर या भागातील प्रत्येकी 1 आणि अंबड शहरातील मदिना चौकातील 1 अशा एकूण 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून 62 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 9 अहवाल प्रयोग शाळेकडे प्रलंबित आहेत. दरम्यान, यापूर्वी प्रयोग शाळेकडून पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या चार रुग्णांचे अहवाल आज दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यात मंठा तालुक्यातील नानसी येथील 3 आणि वैद्यवडगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे.