सुशांत, तुला एकही खांदा मिळला नाही डोकं टेकवून मन मोकळं करायला. तू ज्या बेगडी दुनियेत वावरलास, बघणाऱ्यांना मोठ मोठी स्वप्नं दाखवलीस, तुला मात्र एकही खांदा सापडला नाही मनमोकळं करायला.
तू आकाशाला कवेत घेणारी स्वप्न बघितलीस, ती सत्यात उतरवलीस.. अपार यश प्राप्त केलंस, तरीही तुला या यशाबरोबर जगता आलं नाही. असं काय दुख: घेऊन जगत होतास तुला असं का वाटलं की, या देहातून आत्म्याला मुक्त कराव.
सुशांत, यशाची नशा मोठी असते हे मान्य आहे, किर्तीवंताचं दुख:ही मोठं असेल कदाचित पण तुला ते दुख: हलकं करता आलं असतं. तुला डोकं टेकवायला दुख: हलकं करायला एखादा खांदा नक्कीच मिळाला असता.
सुशांत, तू लिव्ह इन मध्ये राहिलास, तिथे रमलास का नाही माहित नाही. मात्र, एवढं खरं की स्त्री ही क्षणभराची पत्नी असते अन् ती अनंतकाळाची माता असते. त्यामुळे तुला दुख: हलकं करायला एखादा खांदा नक्कीच मिळाला असता.
तू आईच्या नसण्याचं दुख: घेऊन जगत होतास कुडत होतास, हे जरी खरं असलं तरी तिची आठवण तुला नवी उमेद देत राहिली असती, तिच्या आठवणीने तू यशाची आणखी अनेक शिखरं पादाक्रांत करू शकला असतास, अन् तू हे केलं असतस तर तुझ्या आईच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळाली असती. कारण कुठल्याही आई वडिलांच सर्वात मोठं यश किंवा आनंद हा त्यांच्या मुलाने यशवंत किर्तीवंत होण्यातच असतो. पण नियतीला हे का मान्य झालं नाही कुणास ठाऊक, तू तुझ्या आईच्या विरहात यश किर्ती पैसा सोडून तिलाच भेटायला गेलास.
सुशांत, तुला हे टाळता आलं असतं, तू गेल्यानंतर कालच एक शेर वाचनात आला, तो असा होता, हम जिंदा थे तब किसीने नही पूछा हाल हमारा.. अब हमारे खुदखुशी हे चर्चे गली गली मे है…
खरंच माणूस गेल्यावर त्याचं कर्तृत्व खऱ्या अर्थानं कळत म्हणतात, पण तुझं कर्तृत्व तर तू जिवंत असतानाच सिद्ध केलं होतंस, तरीही तुला असं काय झालं होतं.. सुशांत जीवनाचं व यशाचं गमक सांगताना तू दिलेल्या मुलाखतीत तू कितीतरी प्रगल्भ व प्रौढ वाटत होतास. यश प्राप्त करण्यासाठी किती मेहनत घेतलीस हे सांगत होतास. त्यामुळे तू असं काही करशील असं कधीच वाटलं नव्हत, तरीही तू असं का केलस…
सुशांत, पवित्र रिश्तामधील मानवच्या भूमिकेतून तू घराघरात पोचला होतास. आई अन् पत्नी या दोघींच्या मध्ये तुझी होणारी फरफट आम्ही बघितली आहे. तुझे होणारे हाल आम्ही बघितले आहेत. किती सोशिक होतास त्यात तू. आईचा शब्द प्रमाण मानणारा सोशिक अन् मेहनती होतास तू..
सुशांत, तुझ्या कर्तृत्वाचा तुझ्या असण्याचा तुझ्या वडिलांना किती आनंद होत असेल, हे तुला नाही कळणार. आता तू या जगात नाहीस, तू त्यांना सोडून गेलास. तू जाण्यापूर्वी त्यांचा तरी विचार करायला पाहिजे होतास. तू त्यांचा उतारवयातील आधार होतास. आता त्यांनी कुणाकडं बघून जगावं.
तू शोले सिनेमा नक्कीच बघितला असशील, त्यातील इमाम साहब (ए.के. हंगल) यांचा ‘इतना सन्नाटा क्यों है भाई’ हा संवाद प्रसिद्ध आहे. पण त्याच्या पुढचा संवाद कोणत्याही माणसाच्या ह्रदयाला पाझर फोडणारा आहे, जेव्हा इमाम साहब यांच्या लक्षात येतं की आपला मुलगा अहमद (सचिन) या जगात नाही, तेव्हा ते म्हणतात, ‘दुनिया मे सबसे बडा बोझ (दुख:) बुढे बाप के कंधेपर जवान बेटे की अर्थी का बोझ होता है…’ सुशांत तुला हा संवाद आठवला असता तर तू नक्कीच असं केलं नसतसं..!
-विलास इंगळे, संपादक
maharashtratoday.live
ईमेल: vilas.single@gmail.com
मोबाईल: 9422210423
उत्तम लिखाण.असेच लिहित रहा
Thanks Dear