मुंबई: राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६१ टक्के एवढा झाला असून, एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता जास्त झाली आहे. राज्यात आज पाच हजार ७१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५६ हजार ४९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २७८६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५० हजार ५५४ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ६९ हजार ९९४ नमुन्यांपैकी १ लाख १० हजार ७४४ नमुने पॉझिटिव्ह (१६.५२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ८९ हजार १५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५४७ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ८० हजार ६७० खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार ८४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात १७८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळनिहाय मृत्यू असे: ठाणे- १४३ (मुंबई ६८, वसई-विरार २०, मीरा-भाईंदर १३, नवी मुंबई १२, ठाणे १२, पनवेल ७, कल्याण-डोंबिवली ९, पालघर १, रायगड १), पुणे- १६ (पुणे १४, सोलापूर २), नाशिक-१६ (धुळे १३,जळगाव ३), कोल्हापूर-१ (रत्नागिरी १), औरंगाबाद-२ (जालना२).
आज नोंद झालेल्या १७८ मृत्यूंपैकी ६०वर्षे किंवा त्यावरील ९१ रुग्ण आहेत तर ७४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहे. यापैकी ४१ जणांच्या इतर आजाराबद्दल माहिती उपलब्ध नाही. उर्वरित १३७ रुग्णांपैकी ९५ जणांमध्ये (६९.३४ टक्के) मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ४१२८ झाली आहे.