अंबाजोगाई: स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात ४ जून रोजी सायंकाळी दाखल करण्यात आलेला एक पुरुष रुग्ण आणि त्याच्या दोन नातलग महिला रुग्ण अशा एकूण तीन कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांना आज पूर्णपणे बरे झाल्यानंतर सायंकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात ४ जून रोजी धारुर तालुक्यातील आंबेवडगाव येथील ६५ वर्षीय दाखल करण्यात आलेला रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह निघाल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. धारुर तालुक्यातील आंबेवडगाव तालुक्यातील हा रुग्ण गेल्या कांही वर्षापासून मुंबई येथे वास्तव्यास होता. मुंबई येथे कोरोना रोगाच्या प्रसारानंतर तो आपल्या गावी आला होता. प्रकृती अस्वस्थतेमुळे या रुग्णावर सुरुवातीला माजलगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करुनही तो बरा होत नसल्यामुळे त्यास स्वाराती च्या रुग्णालयात आणण्यात आले होते. यारुग्णास कोरोनाची लक्षणे आढल्यामुळे त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता, त्याचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर त्यास स्वारातीच्या कोविड रुग्णालयात त्यास दाखल करण्यात आले होते.
हा रुग्ण कोविड पाॅझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या घरातील इतर लोकांची कोरोना टेस्ट घेण्यात आल्यानंतर दोन महिलांची टेस्टही पाॅझिटिव्ह आढळून आली होती. त्यामुळे या दोन महिलांवर तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात आले होते. या दोन महिला रुग्णांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे १० दिवसाच्या उपचारानंतर आजच त्यांनाही डिस्चार्ज देण्यात आला आहे.
स्वाराती कोविड रुग्णालयातील रुगण हा डायबेटिक रुग्ण असल्यामुळे तो बरा करणे हे तसे उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आव्हानच होते. मात्र, या रुग्णावर तज्ज्ञ डॉक्टरांनी त्याच्या आरोग्याची काळजी घेत सतत १४ दिवसाच्या उपचारानंतर त्यास पूर्ण बरे केले व आज (१६ जून) सायंकाळी त्यास डिस्चार्ज देण्यात आला. स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात दाखल झालेले हे रुग्ण बरे झाल्याने या रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर, परिचारीका व संबंधित कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.