पुणे: कोकण भागात मान्सून वाऱ्यांची चक्रीय स्थिती झाली असून वाऱ्याचा वेग वाढल्याने कोकण, मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात १८ ते २१ जून असे चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली सातारा भागातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सूनने १७ जून रोजी देशाचा ७० टक्के भाग व्यापला असून अंदमान निकोबार ते उत्तर प्रदेशपर्यंत मजल मारली आहे. उत्तरप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने मान्सूनचा वेग वाढला आहे. त्यामुळे मध्य भारतात सलग पाच दिवस मुसळधार तर महाराष्ट्रात सलग चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.