औरंगाबाद: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेल्या आरटीओ कार्यालयाची सर्व कामे सुरू करण्याचे निर्देश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशामुळे आरटीओ कार्यालयाचे कामकाज सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
कोरोनाच्या अनुषंगाने गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून आरटीओ कार्यालय नागरिकांसाठी बंद होते. शासकीय नियमानुसार दहा टक्के कर्मचारी काही प्रमाणात काम करत होते. परंतु असे असले तरीही नागरिकांची सर्व कामे ठप्प झाली होती. लॉकडाऊननंतर अनलाॅकला सुरवात होताच परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी आरटीओचे कामकाज सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. तालुक्यांना होणाऱ्या आरटीओ शिबिरांची कामे वगळता अन्य सर्वच कार्यालयीन कामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे वाहन परवाना देणे, परवान्याची दुय्यम प्रत देणे, तसेच परवाना विषयक सर्व कामे आणि भरारी पथकाच्या कामकाजाला सुरुवात करण्यात येणार आहे. वाहन परवान्यांच्या कामासाठी अपॉइंटमेंट देऊनच कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या संख्येनुसार प्रत्येक कामाचा कोटा निश्चित करण्यात यावा, त्यानुसारच काम करावे असे निर्देश देण्यात आलेले आहेत. दोन अर्जदारांमध्ये किमान सहा फुटाचे अंतर असावे, एका अर्जदाराची चाचणी झाल्यास संगणक की बोर्ड सॅनिटाईज करून घेण्यात यावेत, अर्जदारास मास्क व हॅन्डग्लोज घालूनच कार्यालयात प्रवेश देण्यात यावा. कार्यालयांमध्ये आणि सॅनिटायझर पुरेशा प्रमाणात साठा करून ठेवण्यात यावा.
लॉकडाऊनच्या कालावधीपर्यंत शिकाऊ परवाने जारी केलेल्या व मधल्या काळात ज्यांची वैधता संपली आहे. अशा परवानाधारकांची पक्क्या परवान्याची कामे प्राधान्याने करावीत, पक्क्या परवान्याची चाचणी घेण्याआधी वाहन सॅनिटाइज केल्याची खात्री करावी, पक्क्या परवान्याची चाचणी मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनावर घेतल्यास एका उमेदवारांची चाचणी झाल्यानंतर वाहन सॅनिटाईज करून घेतल्यानंतरच दुसऱ्या उमेदवारांची चाचणी घेण्यात यावी. ज्या अर्जदारांनी सहायक मोटार वाहन पदाच्या परीक्षेसाठी अर्ज भरले असल्यास अशा उमेदवारांची शिकाऊ व महत्त्वाची कामे प्राधान्याने करण्यात यावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशामुळे आरटीओचे कामकाज सुरळीत होण्यास मदत होणार आहे.