जालना: जालन्यात आज आणखी नऊ संशयिताचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, त्यात आठ एसआरपीएफ जवानांचा समावेश असून एकजण काद्राबाद भागातील आहे. दरम्यान, जालना शहरातील लोधी मोहल्ला भागातील एका 60 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 10 झाली आहे.
जिल्हा रुग्णालयातर्फे प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आलेल्या अहवालापैकी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आठजण एसआरपीएफचे जवान असून प्रयोग शाळेकडे प्रलंबित असलेल्या अहवालापैकी काद्राबाद भागातील आणखी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर लोधी मोहल्यातील एक 60 वर्षीय वृद्धाचा आज गुरुवारी सकाळी मृत्यू झाला आहे. हा व्यक्ती मधुमेह या आजाराने ग्रस्त होता.13 जून रोजी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. उपचारासाठी दाखल झाल्यानंतर या व्यक्तीच्या लाळेचे नमुने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. या व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. काल 17 जूनपर्यंत 315 पैकी तब्बल 192 रूग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे रुग्ण बरे होऊन घरी परतण्याची संख्या देखील वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील जनतेला चिंता करण्याऐवजी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.