औरंगाबाद: मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या विविध वाड्.मय प्रकारांतील उत्कृष्ट ग्रंथांना पुरस्कार दिले जातात. २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांतून पुरस्कार निवड समितीने शिफारस केलेले २०२० चे ग्रंथपुरस्कार गुरुवारी (दि.१८ जून) मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी जाहीर केले आहेत. यंदा पुरस्कार वितरण समारंभ न घेता पुरस्कार विजेत्यांना सन्मानचिह व पुरस्कार रकमेचे चेक पोस्टाने घरपोच पाठविण्यात येणार आहेत, असे ठाले पाटील यांनी सांगितले. यावेळी परिषदेचे कार्यवाहक डॉ. दादा गोरे, कुंडलिकराव अतकरे उपस्थित होते.
नरेंद्र मोहरीर वाड्.मय पुरस्कार: मराठीतील कला, संस्कृती, इतिहास किंवा वाड्.मय मिमांसा या संबंधीचा हा पुरस्कार दर दोन वर्षातून एकदा देण्यात येतो. यंदाचा हा पुरस्कार औरंगाबाद येथील डॉ. देवकर्ण मदन यांच्या ‘मराठवाड्यातील साहित्य समिक्षा आणि संशोधन व डॉ. बाळू दुगडूमवार यांच्या ‘बाबा आमटे: व्यक्तीमत्व, कवित्व व कर्तृत्व’ या ग्रंथांना विभागून जाहीर करण्यात आला आहे.
नरहर कुरुंदकर वाड्.मय पुरस्कार: हा पुरस्कार फक्त मराठवाड्यातील कवी, लेखक, समीक्षक, अभ्यास यांच्या कोणत्याही वाड्.मय प्रकारातील उत्कृष्ट ग्रंथाला देण्यात येत असतो. या पुरस्कारासाठी नांदेडचे मनोज बोरगावकर यांच्या ‘नदीष्ट’ या कादंबरीची निवड करण्यात आली आहे.
प्राचार्य म. भि. चिटणीस वाड्.मय पुरस्कार: हा पुरस्कार मराठीतील समीक्षा किंवा वैचारिक लेखनासाठी देण्यात येत असतो. नागपूर येथील यंदाच्या पुरस्कारासाठी चंद्रकांत वानखेडे यांच्या ‘गांधी का मरत नाही’ या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे.
कै. कुसुमताई देशमुख काव्य पुरस्कार: मराठीतील कविता लेखनासाठी दिला जाणारा हा पुरस्कार वर्षभरात प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहांतून निवड करून एका उत्कृट कवितासंग्रहाला देण्यात येत असतो. या वर्षी या पुरस्कासाठी पैठण येथील संदीप जगदाळे यांच्या ‘असो आता चाड’ या कवितासंग्रहाची निवड करण्यात आली आहे.
बी. रघुनाथ कथा-कांदबरी पुरस्कार: मराठीतील उत्कृष्ट कथासंग्रहाला किंवा उत्कृष्ट कादंबरीला हा पुरस्कार देण्यात येतो. या वर्षी बीड येथील सोपान हाळमकर यांच्या ‘वाढण’ या कथासंग्रहाची निवड करण्यात आली आहे.
कुमार देशमुख नाट्यपुरस्कार: मराठीतील उत्कृष्ट नाटकाला किंवा नाट्यसमीक्षेला हा पुरस्कार देण्यात येत असतो. यंदा नांदेड येथील जगदीश कदम यांच्या ‘वडगाव लाईव्ह’ या नाटकाची आणि सुनंदा गोरे यांनी कुमारांसाठी लिहिलेल्या ‘नवीन प्रतीक्षा’ या बालनाट्याची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार दोघांना विभागून देण्यात आला आहे.
रा. ज. देशमुख स्मृतीपुरस्कार: मराठी पुस्तक व्यवहारात हयातभर लक्षणीय स्वरुपाचे कार्य करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येत असतो. या पुरस्कारासाठी पुण्याच्या संस्कृती प्रकाशनच्या प्रकाशक सुनीताराजे पवार यांची निवड करण्यात आली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे प्रा. शेषराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने ही ग्रंथ निवड केली असून, यामध्ये डॉ. सुरेश सावंत, डॉ. जयद्रथ जाधव, डॉ. संगीता मोरे, डॉ. संभाजी पाटील, डॉ. ज्ञानदेव राऊत हे सदस्य होते.