औरंगाबाद: लॉकडाऊन नंतरच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून व योग्य ती खबरदारी घेऊन नियोजन करणे गरजेचे आहे. सामूहिक प्रयत्न या माध्यमातून हे आव्हान आपण पेलू, असा विश्वास कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केला. दरम्यान, शासनाने घेतलेल्या प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) माध्यमातून राबविण्यात येणारे अभ्यासक्रम वगळता बाकी सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश पूर्व परीक्षा न घेता गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल, असेही कुलगुरु डॉ. येवले म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व नवनियुक्त संविधानिक अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी घेण्यात आली. ‘फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. बैठकीस प्र कुलगुरु डॉ प्रविण वक्ते, कुलसचिव डॉ. जयश्री राजेश सूर्यवंशी, तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. भालचंद वायकर, मानव्यविद्या व सामाजिकशास्त्र शाखा डॉ. प्रशांत अमृतकर, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखा डॉ. वाल्मिक सरवदे, आंतरविद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ. चेतना सोनकांबळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. योगेश पाटील, विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपपरिसरचे संचालक डॉ. दत्तात्रय गायकवाड आदींची उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२० या शैक्षणिक वर्षाचे नियोजन नव्याने करावे लागणार आहे. आगामी काळात फिजिकल डिस्टन्सिंग व सर्व खबरदारी घेऊन तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन नियोजन करावे लागेल. त्यादृष्टीने आगामी शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक अधिष्ठाता मंडळ तयार करीत आहे. या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक व प्रशासकीय शिस्त, सुसूत्रता व गतिमानता आणणे जरुरीचे आहे. गेल्या अनेक वर्षानंतर विद्यापीठात पूर्णवेळ संवैधानिक अधिकारी नियुक्त करण्यात आले असून, विद्यापीठाचे कामकाज आता गतीने होईल. आगामी वर्षात प्रवेश प्रक्रियेपासून ते निकालापर्यंत अकॅडमिक कॅलेंडर तयार करण्यात येईल. कोणी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी काळजी घेण्यात येईल. अकॅडमीक ऑडिट, महाविद्यालयांचे संलग्नीकरण तसेच पीएचडी प्रवेश परीक्षा (PET) याबद्दलही तयारी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
राज्य शासनाने घेतलेल्या प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) माध्यमातून राबविण्यात येणारे अभ्यासक्रम वगळता बाकी सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश पूर्व परीक्षा न घेता गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. तसेच पीएच डीसाठी उपलब्ध असणाऱ्या जागा, विद्यार्थी संख्या याचा निश्चित आढावा घेऊनच पेट परीक्षा घेण्यात येईल. सर्व अधिकाऱ्यांनी आपसात समन्वय ठेवून व विद्यार्थी केंद्रित विचार करून काम केल्यास निश्चित विद्यापीठाचा भविष्यकाळ उज्ज्वल असणार आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मानसिक पाठबळ देण्याचे काम सर्वांना करावे लागणार आहे, असेही कुलगुरू म्हणाले.
विद्या परिषद परीक्षा मंडळ अधिकारी मंडळांच्या ऑनलाइन बैठक आयोजित करणे बद्दलची सूचनाही यावेळी त्यांनी केली. विद्यापीठाच्या दृष्टीने सकारात्मक व सामूहिक प्रयत्न करू, अशी ग्वाही नवनियुक्त संवैधानिक अधिकारी यांनी दिली. कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली.