# साहित्यिक किशोर घोरपडे यांचे निधन.

 

औरंगाबाद:  जालना शहरातील आंबेडकरी चळवळीतील प्रतिभावंत साहित्यिक किशोर घोरपडे (वय७८) यांचे शनिवारी सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

दलित साहित्य हे जाणीव असलेले साहित्य म्हणून नावारूपास आले आहे. तत्कालीन सामाजिक परिस्थितीची आपल्या साहित्यातून मांडणी करणारे साहित्यिक मराठवाड्याने जन्माला घातले आहेत. त्यातील किशोर घोरपडे हे सुद्धा असेच एक साहित्यिक होते. जालना येथील कवी, कथाकार व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते सुपरिचित होते. भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को या खेडेगावी जन्मलेले किशोर घोरपडे नंतर जालना येथे स्थायिक झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते वीज मंडळात नोकरीस लागले. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेतांना दलित व सामाजिक चळवळीत त्यांचा सहभाग होता. वीज मंडळात नोकरी सांभाळून घोरपडे यांनी सामाजिक भान ठेवून सामाजिक कार्यही केले. शालेय जीवनापासूनच साहित्याची गोडी असल्याने घोरपडे हे लिहिते झाले. तत्कालीन सामाजिक परिस्थिती व संघर्ष तसेच कामगारांचे प्रश्न आदी विषयांवर ते लेखन करू लागले. साहित्य लेखन करतांना त्यांनी व्याख्याने, कथाकथन, काव्यवाचनाच्या निमित्ताने अख्खा महाराष्ट्र पायाखाली घातला. विविध दिवाळी अंकांचे त्यांनी यशस्वी संपादनही केले. वीज मंडळातील नवोदित साहित्यिकांना सोबत घेऊन ‘श्रेयस’ ही नाट्य चळवळ सुरू करण्यात घोरपडे यांचा पुढाकार होता. नवोदित साहित्यिकांना संधी देण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे. आंबेडकरी चळवळीला वाहिलेल्या नियतकालिके व वृत्तपत्रांतून त्यांनी लेखन केले आहे. सामाजिक चळवळ आणि समाजप्रबोधन तेवत ठेवण्यासाठी जालना शहरात किशोर घोरपडे यांनी अनेक मेळावे, परिषदा, परिसंवाद घडवून आणले. जालना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेच्या संस्थापकांपैकी ते एक होते. आजही  ही व्याख्यानमाला अविरत सुरू असून, या व्याख्यानमालेचे अध्यक्ष, सचिवपदही घोरपडे यांनी भूषविले.

‘स्नेहल लक्षवेधी’ या टोपणनावाने त्यांनी समाजाचे प्रश्न वृत्तपत्रातून मांडून शासनाचे लक्ष वेधून घेतले. तसेच समाज व सांस्कृतिक प्रबोधनाचे वैचारिक लेखनही त्यांनी वृत्तपत्रांतून मांडले. त्यांचा ‘डहाळी’ हा प्रातिनिधीक काव्यसंग्रह, ‘धग’ हा कथासंग्रह, ‘दलदल’ हा काव्यसंग्रह, ‘घुसमटनी’ हा कथासंग्रह, मालक, सोयरिक, पिंजरा, धम्मक्रांती आदी त्यांच्या ग्रंथसंपदा आहेत. शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात त्यांच्या साहित्याचा समावेश आहे.

किशोर घोरपडे यांचे कथासंग्रह व काव्यसंग्रह हे सामाजिक वास्तवतेचे भान निर्माण करणारे आहेत. सामाजिक अस्मितेचे भान हे त्यांच्या साहित्याचे शक्तीकेंद्र होते. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ‘गुणवंत कामगार पुरस्कार’, ‘महानुभाव ग्रंथोतेजक पुरस्कार’, ‘विश्वकर्मा पुरस्कार’, अस्मितादर्श वाड्.मय पुरस्कार’, ‘तुका म्हणे वाड्.मय पुरस्कार’ आदी त्यांच्या नावावर आहेत. श्रमिक कष्टकऱ्यांचे दुःख आपल्या साहित्य संपदेतून मांडणारे किशोर घोरपडे हे कसलेले साहित्यिक होते. त्यांचे साहित्य हे श्रमिक व कष्टकऱ्यांचे दुःख मांडणारे असले तरी त्यांच्यात नवी उमेद निर्माण करणारेही आहे. नवोदित साहित्यिकांचे मार्गदर्शक म्हणून आज किशोर घोरपडे यांचे नाव घेतले जाते. आंबेडकरी विचारधारेचे साहित्यिक म्हणून घोरपडे यांचे नाव घेतले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *