# या वर्षातील पहिले सूर्यग्रहण पाहण्याची संधी; रविवारी सकाळी १० वा. प्रारंभ.

 

औरंगाबाद:  या वर्षातील पहिले सूर्यग्रहण, रविवार, २१ जून ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पहायला मिळणार आहे.  सकाळच्या वेळेत हे ग्रहण दिसणार आहे. या ग्रहणाच्या आधी व नंतर येत असलेल्या पौर्णिमेला दोन चंद्रग्रहण आहेत.

हे कंकणाकृती सूर्यग्रहण मध्य आफ्रिकन रिपब्लिक, कांगो आणि इथिओपियासह आफ्रिकेच्या काही भागांतून पाकिस्तानच्या दक्षिणेस आणि उत्तर भारतासह चीनमध्येही दिसू शकेल. ओमान व भारतात केवळ सहा महिन्यात दोन कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळाली आहे. उत्तर भारतात राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या उत्तरेकडील भाग व उत्तरांचल या प्रदेशांत काही ठिकाणी हे सूर्यग्रहण कंकणाकृती स्वरुपात दिसणार आहे. देशभरातील महाराष्ट्रासह इतर सर्व राज्यांमध्ये हे सूर्यग्रहण खंडग्रास स्वरुपाने दिसेल.

यावेळी भारतातील कंकणाकृती स्थिती ३३ ते २८ सेकंद दरम्यान असणार आहे. या सूर्यग्रहणानंतर साधारण २०३१ पर्यंत खग्रास किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.

महाराष्ट्रभर दिसणार सूर्यग्रहण:  महाराष्ट्रात हे सूर्यग्रहण कंकणाकृती न दिसता खंडग्रास अवस्थेत दिसणार आहे. साधारणत: सकाळी दहा वाजता हे ग्रहण सुरू होईल व दुपारी दीड वाजेच्या दरम्यान ग्रहण मोक्ष पहायला मिळेल. औरंगाबाद शहरात ग्रहण स्पर्श, मध्य, मोक्ष व ग्रहण कालावधी संदर्भात श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार:

औरंगाबाद येथे
ग्रहण स्पर्श : १०:०६
ग्रहण मध्य : ११:४६
ग्रहण मोक्ष : १३:३६
ग्रहण कालावधी : ०३ तास ३० मिनिटे.

ग्रहण कसे पहाल:
नुसत्या उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे अजिबात पाहता कामा नये. कायमचा आंधळेपणा येण्याची शक्‍यता असते. आपण भिंगानं सूर्याची छोटी प्रतिमा घेऊन कागद, कापूस जाळायचे खेळ केलेले आठवा. आपल्या डोळ्यांतही भिंग असतं आणि सूर्याकडं पाहताना अर्थातच डोळ्यातल्या मागच्या पडद्यावर सूर्याची प्रतिमाच तयार होत असते. सूर्याच्या या प्रतिमेमुळं पडद्याचा तो भाग जळून जाईल. डोळ्यांतल्या पडद्याच्या पेशी एकदा जळून मेल्या की त्या जागी नव्या पेशी तयार होत नाहीत. मोबाईल किंवा कॅमेरा याने सूर्यग्रहणाच्या काळात किंवा इतर वेळीही डायरेक्ट फोटो काढणे आपल्या डोळ्यांसाठी हानिकारक आहे त्यांनासुद्धा सोलर फिल्टर लावणे आवश्यक असते.

ग्रहण चष्मे वापरा:
सूर्याकडे उघड्या डोळ्याने बघू नका. सूर्यग्रहण सर्वसाधारण “सनग्लासेस “ ने पाहणे सुरक्षित नसते. सूर्य आणि सूर्यग्रहण पाहण्यासाठी खास तयार करण्यात आलेले “ग्रहण चष्मे” वापरा. त्यातून सूर्याकडून येणारी घातक अतिनील किरणे रोखली जातात. सध्या कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी आपापसांत सुरक्षित अंतर ठेवून सुरक्षितपणे सूर्यग्रहण पाहावे.
-श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, औरंगाबाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *