पुणे: सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी सायंकाळी वैश्विक आध्यात्मिक नेते गुरुदेव श्री श्री रविशंकर सुमारे 20 हजार श्री श्री योग शिक्षक तसेच जगातील लाखो लोकांसोबत ऑनलाईन ‘योग साधना’ करणार आहेत. पुण्यासह राज्यभरात ठिकठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे ऑनलाईन ‘स्पिरीट ऑफ योग’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘कॉमन योगा प्रोटॉकाल’नुसार योग प्रदर्शन होणार आहे. या माध्यमातून राज्यभरातील जवळपास 25 हजार लोक घरच्या घरी योगासने करणार आहेत.
कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा आपापल्या घरीच योग साधना केली जाणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मची मदत घेतली जात आहे. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’तर्फे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी रविवार, 21 जून रोजी सायंकाळी पाच वाजता फेसबुक लाइव्ह कार्यक्रम घेतला जाणार आहे. यात मानसिक आरोग्य आणि मन:स्वास्थ्य याबद्दल चर्चा व प्रबोधन केले जाईल. यासोबत 700 हून अधिक आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक व स्वयंसेवक यांनी विविध कंपन्यांच्या तसेच विविध क्लब हाऊससोबत योग शिबिराचे आयोजन केले आहे, ज्यात सुमारे 25 हजारांहून अधिक लोक सहभाग घेणार असल्याचे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या लाईफ कोच कुमकुम नरेन यांनी सांगितले.