# खा. सुप्रिया सुळे यांना प्राईम पॉइंट फौंडेशनचा संसद महारत्न पुरस्कार जाहीर.

 

पुणे: चेन्नई येथील प्राईम पॉइंट फौंडेशन आणि इ- मॅगॅझीनतर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना जाहीर झाला आहे. याबरोबरच विद्यमान सतराव्या लोकसभेतील त्यांची उपस्थिती आणि चर्चेतील सहभागासाठी सलग सहाव्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना फौंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे, असे फौंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी कळविले आहे. गत सोळाव्या लोकसभेत सुळे यांनी सभागृहात ९६ टक्के उपस्थिती लावत १५२ चर्चासत्रांत सहभाग घेतला. त्यांनी एकूण ११८६ प्रश्न उपस्थित केले, तर २२ खासगी विधेयके मांडली. यासाठी त्यांना फौंडेशनतर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

चालू सतराव्या लोकसभेतही सुळे यांच्या कामगिरीतील सातत्य कायम असून त्यांनी ८९ टक्के उपस्थिती लावत १०३ चर्चासत्रात भाग घेतला आहे. सभागृहात एकूण २१३ प्रश्न त्यांनी विचारले असून चार खासगी विधेयके मांडली आहेत. या कामगिरीसाठी त्यांना पुन्हा एकदा म्हणजे सहाव्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *