# कोरोनोत्तर काळाचं संदिग्ध चरित्र आणि सामाजिक, सांस्कृतिक व्यवहार -पी.विठ्ठल.

 

अगदी काल परवापर्यंत म्हणजे कोरोनापूर्व काळात आपल्या
भौतिक जगात एखादी घटना घडली तर तिचे परिणाम केवळ एखाद्या क्षेत्राला
मर्यादित अर्थाने बाधित करण्यापर्यंत सीमित होते. उदा. युद्ध, भूकंप, दुष्काळ अशा
मानवनिर्मित वा नैसर्गिक प्रकोपांचा परिणाम हा एखाद्या विशिष्ट भूभागवर होत होता.
त्याचे कमी अधिक परिणाम जगावर होत असले तरी संपूर्ण जग ठप्प झाले
आहे किवा भयाच्या, मृत्यूच्या सावटाखाली आले आहे, असे मानवी इतिहासात यापूर्वी अपवादानेही घडलेले नव्हते. किंवा भविष्यात तसे काही घडेल याचे भाकीतही जगातल्या कोणत्याही ज्योतिष, तत्ववेत्ते वा वैज्ञानिकांनी केलेले नव्हते.
अगदी दोन महिन्यापूर्वीपर्यंत संपूर्ण जगाचे दैनंदिन जगणे अत्यंत प्रवाही आणि नैसर्गिक होते. म्हणजे एखाद्या विशिष्ट भूभागावर जगण्याचे काही प्रश्न नक्कीच होते ; पण त्याची झळ संपूर्ण जगाला कधी बसली नव्हती. मात्र प्रकृतीचा अंदाज कुणालाच घेता येत नाही. मानवी मनाच्याच काय पण ज्ञान- विज्ञानाच्या व्यापक
अवकाशातही ज्याची कधीच चर्चा झाली नव्हती, अशा एक अदृश्य आणि विराट विनाशकारी विषाणूने संपूर्ण जगाला ढवळून काढले आहे. कधीही न थांबणाऱ्या माणसाच्या महाकाय मेंदूची मती कुंठीत झाली. त्याचे पाय थांबले. त्याने
निर्मिलेल्या साऱ्या साऱ्या वस्तू आणि वसाहती थांबल्या. थोडक्यात या विषाणूने जगाच्या अमर्याद गतीला, वेगाला जबरदस्त विळखा घातला. मानवी अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला. माणसाची बुद्धी आणि विवेक खंडित झाला.
त्याच्या संवेदना बधीर झाल्या. सत्ता संबंधाची नवी समीकरणे तयार झाली.
पारंपरिक आणि वैज्ञानिक जगाची सीमारेषा धूसर झाली.
एकूणच कायतर माणसाची संपूर्ण सुरक्षितता धोक्यात आल्यामुळे एका निर्णायक टप्प्यावर आपण येऊन थांबल्याची जाणीव माणसाला झाली. धर्म, समाजव्यवस्था, विचारधारा आणि नीती- अनिती वा तथाकथित संस्कृतीचे सगळे
दरवाजे खिळखिळे झाले. मानवी सहजीवनाचे, नात्यागोत्याचे संवेदनशील भावविश्व संशयाच्या फेऱ्यात अडकले. पर्यायाचे सारे दोर कापल्यानंतर जी एक
अगतिक हतबलता वाट्याला येते, त्या अगतिकतेने आपण आज या काळाला सामोरे जात आहोत. यापूर्वी कधीही माणूस इतका विकल, केविलवाणा नि भयग्रस्त झाला नव्हता. पण एका अदृश्य विषाणूने मानवी संस्कृतीचे संपूर्ण चरित्रच बदलून टाकले.

स्थलकालविशिष्ट सत्तासंबंधाचे, धर्माधिष्ठित अंतर्विरोधाचे आणि प्रचंड अशा भौतिक स्थित्यंतराचे चित्रच बदलूनच टाकले. भांडवलशाही आणि काळानुरूप
स्थिर होत गेलेल्या विचारव्यूहाच्या जाणीवाही एकदम गोठून गेल्या. नातेसंबंधाची पुनर्चिकित्सा करण्याचे एक अर्थपूर्ण, पण अत्यंत नैसर्गिक भान ह्या काळाने जगाला
दिले. अनेक जाती आणि धर्मभेदांच्या विटांनी रचलेली एक वैश्विक भिंत कोसळली
आणि आता नव्या जगाची, नव्या पर्यायांची पुनर्मांडणी करण्याची वेळ माणसावर आली. या बदलत्या वास्तवाचा अर्थ लावणे खूप अवघड आहे. हे बदल केवळ भौतिक स्वरुपाचेच नाहीत, तर या बदलांनी आपल्या सांस्कृतिक जाणिवेला,
मुल्यांनाही एक मोठा धक्का दिला आहे. आपल्या समग्र पर्यावरणाची म्हणजे आपल्या आदिम भोवतालाची एकदम लय बिघडून गेली. भावनात्मकता अधिक
प्रबळ झाली आहे. साऱ्या साऱ्या सशक्त परंपरांचे पर्वच संपुष्टात येते की काय? अशी एक तीव्र भीती निर्माण झाली आहे. उत्तर आधुनिक प्रचंड प्रगत अशा काळातल्या या भितीनं आपल्या चौकटबंद, आखीवरेखीव जगण्याच्या मर्यादाच
स्पष्ट केल्या आहेत. देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री सातत्याने टीव्हीवर येत आहेत.
लोकांना दिलासा देत आहेत. हेही पहिल्यांदाच घडत आहे. तुटलेपणाची, एकाकीपणाची जाणीवही तीव्र होत आहे.
कोरोनापूर्व आणि कोरोनोत्तर अशी या काळाची आता आपल्याला विभागणी करावी लागेल. कारण मानवी इतिहासातील हा एक वेगळाच कालखंड आहे. या काळाने आपल्या सर्व धारणांनाच छेद दिला आहे.
परस्परसंबंधाचं पुनर्मुल्यांकन करायला भाग पाडलं आहे. येणारा काळ हा नेमका कसा असेल हे सांगता येत नाही. आपल्या सार्वजनिक जगण्यावर, वर्तनावर आणि सामाजिक, राजकीय, आर्थिक संरचनेवर नेमका काय परिणाम होणार आहे?
याबद्दलही काही ठोस सांगता येणे कठीण असले तरी काही दूरगामी परिणाम नक्कीच होणार आहेत. संवेदनशील, विचारी माणसं या काळाकडे आता कसं बघतील? लॉकडाऊनचा काळ जेमतेम महिना दीड महिन्याचा असला तरी या कमी
वाटणाऱ्या काळाने माणसाच्या तथकथित प्रतिष्ठेचा, कावेबाजपणाचा, अहंकाराचा
आणि समाजमाध्यमातून आकाराला आलेल्या त्याच्या पोकळ आभासी भ्रमाचा फुगा फोडून टाकला आहे. म्हणजे आपल्या लौकिक जगण्यावर या काळाचे अनेक ठसे
उमटणार आहेतच; पण माणसाच्या जीवन आणि कलाव्यवहारावरही या घटनेचा तीव्र परिणाम होवू शकतो. आत्मशोधाची एक नवी वाट या काळाने आपल्याला
दाखवलीय. मुलभूत अशा जैवप्रेरणेवरही संभ्रम निर्माण केला आहे.

माणसाच्या कारुण्याला जसं या काळाने अधोरेखित केले तसेच त्याच्यातल्या हिंस्त्रतेचा चेहराही अधोरेखित केला आहे. म्हणजे या काळात हजारो लोक एकमेकांना मदतीसाठी अहोरात्र झटताहेत, तर त्याचवेळी आपल्या गावहद्दीत प्रवेश करणाऱ्या साधूंना
अत्यंत अमानुषपणे संपवण्यात आले आहे. एकाच काळातला हा अंतर्विरोध सुन्न
करणारा आहे. या सगळ्या घटिताला वैयक्तिततेच्या पलीकडे जावून समजून घ्यावे
लागणार आहे. कारण कळत नकळत या काळाने आपल्या संवेदनशीलतेचा
अवकाश संकुचित केला आहे.
काम धंद्यानिमित्त बाहेरच्या गाव- शहरात गेलेल्यांना त्यांच्या घराची दारे बंद करण्यात आली. सग्यासोयऱ्यांनीच केलेली ही गावबंदी चक्रावून टाकणारी आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले. झाडे तोडून रस्ते अडवण्यात आले. बॅरिकेट्स टाकण्यात आले. अंत्यविधीला परवानगी नाकारण्यात आली. नाते आई- मुलाचे असो की पती- पत्नीचे, मित्रत्वाचे असो की अपरिचित अशा
सहवेदनेचे- एका भयावह अशा आधुनिक अस्पृश्यतेचा (सोशल डिस्टन्सिंग या
अर्थानं) नवा प्रत्यय या काळाने दिला. हे सगळं केव्हा संपेल ? संपेल की नाही?
माहीत नाही. कदाचित तांत्रिकदृष्ट्या लॉकडाऊन संपलेलं असेलही, पण मनामनात
गाव शहरात, जातीधर्मात उभ्या राहिलेल्या तणावांच्या भिंती संपतील काय? समाजमनाच्या जाणिव- नेणिवेवर, त्याच्या आंतर्बाह्य चरित्रावर आणि त्याच्या स्थितीशील मनोवृत्तीवर जे मरणभयाचे नि अविश्वासाचे आक्रमण या विषाणूने केले
त्यातून सहज मुक्त होता येईल काय? एखाद्या घटनेची धग किती जिवघेणी असते याची प्रचिती यामुळे आपल्याला झाली. माणूस अधिक सोशिक झाला.
अपेक्षाभंगाचे एक अनपेक्षित दु:ख त्याच्या वाट्याला आले. भूक, कौटुंबिक हिंसा
आणि वार्धक्यासह घरोघरचे हजार प्रश्न पुढे आले. एकमेकांच्या सहवासात प्रदीर्घ
राहणेही काहिंना नकोसे झाले. या काळाने जगाला विचार करायला भाग पाडले आहे. पण खरंच माणूस विचार करणार आहे? त्याच्या जगण्यात काही बदल
घडणार आहे? तो अधिक संवेदनशील बनणार आहे? या काळाने आपल्याला अधिक जबाबदार बनवले आहे की आपली निर्भत्सना केली आहे. या काळातल्या मनोव्यापाराचा अर्थ कसा लावायचा? म्हणजे या काळाविषयी एखादा वस्तुनिष्ठ
निष्कर्ष नोंदवणे खूपच कठीण आहे. प्रारंभी म्हटल्याप्रमाणे अशा एखाद्या घटनेचा परिणाम हा केवळ भौतिक नसतोच कधी. त्याशिवाय भावनिक आणि मानसिकही असतो. शारीरिकही असतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सांस्कृतिकही असतो. अशा घटनेपासून कलाव्यवहार मुक्त राहू शकत नाही. म्हणजे कला व्यवहार बाधित झाला की त्याचे कमी अधिक पडसाद हे माणसाच्या समग्र जगण्यावर उमटतात. सौंदर्याचे निकष बदलतात. तत्त्वज्ञानाची भाषा बदलते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विज्ञानाची लालसाही
अधिक गतिमान होते. याचा अर्थ असा की परिस्थिती ही मानवी संस्कृतीवर मोठा प्रभाव टाकते. तर्कविचारांचे नवे अर्थ उमगतात. कधीकाळी प्रिय वाटणारी व्यक्ती
अथवा वस्तू अशा घटनांमुळे एकदम अप्रिय वाटायला लागते. किंवा याच्या उलटही
घडू शकते.
काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला. ख्यालीखुशालीच्या
अनौपचारिक गप्पा झाल्यानंतर मी म्हटलं, ‘बाकी सर्व ठिक ना?’ तर ती म्हणाली,
‘हो रे ! पण आईचा खूप वैताग आलाय.’ खरं तर तिची ही प्रतिक्रिया अगदीच
अनपेक्षित होती. कारण त्या दोघीतले परस्परसंबंध किती जवळचे आहेत याची मला कल्पना होती. पण वयवर्ष ऐंशी असलेल्या आईचा या काळात वैताग वाटणे किंवा अगदी ‘ती गेली तरी बरे’ असे म्हणणे याच्यामागे या काळाने घालून दिलेली एक भीती आहे. ‘साठी पार केलेल्या वृद्धांची काळजी घ्या. त्यांना कोरोनाचा
अधिक धोका आहे.’ असे सरकारी फतवे सातत्याने माध्यमातून फिरत आहेत. या
आदेशात काळजी आणि भय आहे. त्यामुळे त्या मैत्रिणीला असे वाटणे अगदीच अस्वाभाविक नाही. अर्थात तिचा हेतू खूप नकारात्मक आहे असे नाही. पण काही झालेच तर होणारा त्रास सहन करण्यापलीकडचा असल्याची जाणीव तिला आहे.
वृद्धांच्या आहार आणि आरोग्याचे दैनंदिन वेळापत्रक अशा काळात सांभाळणे ही कठीण गोष्ट असते. त्यामुळे भय, त्रागा, आणि दुःखाच्या भावस्थितीतून व्यक्त
झालेली ही भावना या काळातल्या माणसाचा नेमका स्वभाव तर उजागर करत
नाहीत ना? भलेही असे संभाषण वरकरणी कुटुंबसंस्थेचं वा सामाजिक नितीनियमांचं उल्लंघन करणारे वाटत असले तरी आजच्या अस्थिर काळातली ही एक स्वाभाविक वृत्ती आहे. नात्यांचा- नात्यातल्या कणवेचा ऱ्हास होण्याची नि नैतिक चौकट ओलांडायला पूरक ठरणारा हा काळ आहे. लॉकडाऊनच्या बंदिस्तपणाने असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
एक लिहिता माणूस म्हणून हे सगळेच प्रश्न मला अस्वस्थ करताहेत. या छोट्या
वाटणाऱ्या काळाने आपल्याला आरपार बदलून टाकले आहे.

वर्तमानपत्रांचे जाहिरात विरहित नवे रूप आकाराला आले. इलेक्ट्रॉनिक मीडियातल्या चर्चेचा सूर बदलला. सोशल मीडियातल्या पोस्ट बदलल्या. कुटुंबाची दैनंदिनी बदलली.
शारीरिक आणि बौद्धिक स्वास्थ्याचे प्रश्न बदलले. आपण जिथे राहतो, जिथे नोकरी
वा व्यवसाय करतो त्या साऱ्या आस्थेच्या जागा एकदम अनोळखी आणि अविश्वासार्ह झाल्या. नव्वदच्या दशकातल्या ऐतिहासिक मालिकांचा टीआरपी
वाढला. हे कसे काय घडले? लोकांची अभिरुची बदलली की आधुनिकतेचे आकर्षण कमी झाले. आजच्या थोर तंत्रज्ञानयुक्त डिजिटल सिनेमांपेक्षा रामायण, महाभारत, चाणक्य, बुनियादकडे प्रेक्षक कसा वळला? अन्य चॅनेल्सचे असंख्य पर्याय उबलब्ध असतानाही लोक पारंपरिक महाकाव्याकडे का वळले? या घटनेचा अन्वयार्थ कसा लावायचा? अर्थात याही काळात नेटफ्लिक्स, युट्युबवरील विविध स्वरूपाच्या वेबसिरीज पाहणाराही वर्ग आहेच. पॉर्न व्हिडीओ बघण्याचे प्रमाणही वाढले आहे. फेसबुक, व्हॉट्सअपचा मोठ्या प्रमाणात वापरही सुरु आहेच. हे सगळं अगदीच निरर्थक आहे असं नाही म्हणता येत. या सगळ्या काळाकडे लेखक, कवी, कलावंत कसे पाहणार आहेत? हा खरा प्रश्न आहे.

सर्वसामांन्यांचे जगणे डळमळून गेले आहे. प्रतिष्ठितांचे (?) सामाजिक स्थान अडचणीत सापडले आहे. अतिश्रीमंतांची जागतिक स्तरावरील पत घसरली आहे. उद्योगधंदे बंद झाले आहेत. मजुरांचे विस्थापित लोंढे देशभर पायी भटकत आहेत. ऑनलाईन शाळा सुरु झाल्यामुळे घरोघरी मुलं कानाला हेडफोन लावून मोबाईलमध्ये डोळे रुतवून बसले आहेत. झूम बैठका आणि वर्क फ्रॉम होम सुरु आहे.
प्रसारमाध्यमांचीही उपयुक्तता संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लेखन वाचनाचे नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत. फेसबुक लाइव, झूम हे संवादाचे नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत. अधूनमधून स्वतःच्या वाढदिवसाचे, बायको आणि
मुलांच्या किंवा लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो अपलोड करणारे लोकही आता थेट ‘मी
अमुक तमुक वाजता आपल्याला लाइव भेटणार आहे’ असं म्हणून चक्क निरर्थक भाषणे झोडत आहेत किंवा अत्यंत सुमार कथा कवितांचे वाचन करत आहेत.
बोलण्यासाठी मिळालेल्या या नव्या माध्यमाचा या काळात मोठाच प्रसार झाला आहे. लग्न, मुंजीचे आणि अगदी अंत्यविधीचे ऑनलाईन सोपस्कार लोक करताहेत. हा एक कमालीचा बदल आहे. काही पर्यावरणीय सकारात्मक बदलही होत आहेत.
म्हणजे मुंबईच्या समुद्रातले डॉल्फिन किनाऱ्यापर्यंत आले आहेत. पशु पक्षांचा
मानवी वसाहतीत मुक्त संचार वाढला आहे. किंवा अगदी दुरूनही हिमालय किंवा
ताजमहाल दिसू लागला आहे वगैरे. म्हणजे प्रदूषण पातळी कमालीची घटली आहे.
तर एका अर्थाने हे बरेच झाले. निसर्ग संतुलन साधत असतोच.
तर सांगायचा मुद्दा हा की सामाजिक जगण्यापासून ते हवामान बदलापर्यंत अनेक अद्भुत आविष्कार आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत. ही
स्थित्यंतराची जाण लिहित्या माणसाला ठेवावी लागेल. सामाजिक आणि
सांस्कृतिक अंतरंगाचा नव्याने विचार करावा लागेल. तबलगी जमातचे एकत्र येणे
ही घटना एकदम सामाजिक विद्वेषापर्यंत पोहोचली. लोकांच्या मनात संशय वाढला. त्याचवेळी पायाची कातडी फाटेपर्यंत मजुरांचा शेकडो मैलाचा प्रवासही
घडला. जागोजागी अडकलेल्या आप्त स्वकियांविषयीची काळजीही वाढली.
रोजच्या रोज काम करून जगणाऱ्यांचे अतोनात हाल झाले. अशा कितीतरी गोष्टी
नव्याने घडल्या. अशावेळी दातृत्त्वाचे अनेक हात पुढे आले. ही घटनाही महत्त्वाचीच. स्वत:ची सुरक्षितता धोक्यात घालून अहोरात्र काम करणारा प्रशासकीय वर्ग असो की जीवनावश्यक वस्तू न मिळाल्यामुळे होणारी घुसमट दाबून ठेवणारे लोक असोत – हा संपूर्ण काळ भयाचा, गोंधळाचा आणि प्रचंड अशा अस्थैर्याचा आहे. भविष्याची चिंता वाहणाऱ्या अनेक पिढ्यांचा या काळाने मोठा अपेक्षाभंग केला आहे. त्यांना उद्विग्न केले आहे. माणसाच्या जगण्याचा केंद्रबिंदूच
हलला आहे. सामाजिक संवादाला आणि भेटीगाठीतल्या निकोप संवादालाही बाधा
आली आहे. या काळाला समंजसतेने समजून घ्यावे लागणार आहे. कारण असे अनेक
दृश्य- अदृश्य ताणेबाणे आपल्या भोवतालात असणार आहेत. सर्जनशील माणसाला
या ‘काळलिपी’ चे आकलन करून घेता येईल काय? येणारा काळ हा अद्भुत आणि
प्रचंड ताणाचा असणार आहे. या काळातल्या साहित्य आणि कलांमधून नवनवे अनुभव प्रत्ययास येतील. आपली इच्छा असो वा नसो आपल्याला हे वास्तव स्वीकारावेच लागणार आहे. या दरम्यानच्या भौतिक आणि मानसिक संवेदनेच्या आत प्रवेश करावाच लागेल. तरच या सर्वव्यापी भयंकर कोलाहलाला चिमटीत पकडता येईल. हरिश्चंद्र थोरात यांनी यासंदर्भात एका फार महत्त्वाच्या बाबीचे सूचन केले आहे. ‘लिहिण्याबाबतची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका पाठोपाठ एक कल्पित प्रदेश वेगानं नाहीसे होत चालले आहेत. वास्तवावर भाष्य करण्याची
कल्पिताची अद्भुत क्षमता संपून गेल्यासारखे वाटू लागले आहे. वास्तवात असलेल्या जगापेक्षा काहीतरी वेगळी, नवी, नव्या मूल्यांना आवाहन करणारी,
माणूसपणाचे नवे अन्वयार्थ शोधणारी, त्याची विविध परिणामे स्पष्ट करू पाहणारी कल्पिताची अवतरणे पुढे यायला दचकू लागली आहेत. वास्तवात घडते आहे तेच एवढे अभूतपूर्व वाटते आहे, की कल्पिताला आवाहन करणे अनावश्यक ठरू लागले
आहे.’ (मुक्त शब्द, एप्रिल २०२०) थोरातांचे हे म्हणणे अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे. कारण हा संपूर्णकाळ कलावंतांच्या सर्जनप्रक्रियेवर प्रभाव टाकणारा आहे. म्हणजे समंजसपणे या काळाची छाननी केली तरच एखादी सर्वोत्तम संहिता हाती लागू शकेल. मनात योजलेली लेखनसिद्धी आणि समोर असलेले प्रश्न –याचा ताळेबंद
लावता यायला हवा.

एखादा काळ आपल्याला किती प्रभावित करतो हे पहायचे असेल तर या काळातली काही वर्तमानपत्रे जरी आपण चाळली तरी आपल्याला कळू शकेल. दहा पंधरा पृष्ठांच्या वर्तमानपत्रात एकदोन पाने सोडली तर फक्त आणि फक्त कोरोनाविषयक बातम्या दिसताहेत. जाहिराती नाहीत की मनोरंजनाच्या ग्लॅमरस गोष्टी नाहीत. सेलिब्रिटीचा फॅशनेबल वावर नाही की नेत्यांची आततायी भाषणे नाहीत. हे का घडले? कारण आपल्या सामाजिक जगण्याच्या पटलावर
आणि विचारकेंद्रावर या घटनेने घट्ट पाय रोवले आहेत. या विषाणूच्या बऱ्या वाईट
परिणामांची चर्चा वाऱ्याच्या वेगाने जगभरात पसरल्यामुळे बऱ्यापैकी विस्कळीत
जगणारी माणसेही गंभीर झाली. म्हणजे वस्तूस्थितीचे भान आल्यामुळे अन्य गोष्टी
फिजूल ठरल्या. या घटनेपासून मानसिकदृष्ट्या थोडेफार दूर जावे म्हणून टीव्ही, मोबाईल, पुस्तके माणसाच्या अधिक जवळ आली. थोडक्यात काय तर कोरोना काळाने माणसाच्या दृष्टीकोनात कमालीचा बदल झाला. एक उदाहरण मुद्दाम सांगतो,
माझ्या छोट्या मुलीकडे वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आकाराच्या अनेक
बाहुल्या आहेत. खेळण्यातले अनेक प्राणीही आहेत. एकेदिवशी तिने भल्या सकाळी
कागद कापून छोटे छोटे मास्क बनवले. आणि ते सर्व मास्क तिने बाहुल्यांच्या आणि छोट्या प्राण्यांच्या तोंडाला बांधले. माध्यमप्रणीत किंवा सातत्याच्या सामाजिक चर्चेचा कळत नकळत परिणाम बालमनावर कसा होतो याचे हे एक उदाहरण.
म्हणजे आपल्या भावविश्वाच्या जवळ जी गोष्ट असेल तशी कृती आपल्याकडून घडते. या निरागस कृतीचा आणि त्यामागे असणाऱ्या अदृश्य भयाचा लेखक किंवा कवी म्हणून मला विचार करता आला तरच माझ्या निर्मितीला काही अर्थ असणार
आहे. अशा घटनांकडे केवळ बालमनाचे खेळ म्हणून दुर्लक्ष नाही करता येणार.
कारण कोणत्याही निर्मितीच्या मागे एक विशिष्ट स्वरुपाची पार्श्वभूमी असतेच.
त्यातून लेखक, कवीला आवाहन मिळते. या आवाहनाचा आवेग किती आणि कसा आहे यावर त्या निर्मितीचे मूल्य ठरते. निर्मितीची अनेक अज्ञात क्षेत्रे यामुळे साक्षात
होवू शकतात. चिंतनाचे, सृजनाचे, परिभाषेचे नवे आविष्कार आकाराला येवू
शकतात. साहित्य आणि समाजाचे परस्पर संबंध सर्वश्रुत आहेतच; पण समकाळात
जे घडतंय ते पाहिलं की घडणाऱ्या सगळ्याच घटनांना लेखक सामोरा जावू शकेल
की नाही? हा प्रश्न आहेच. सर्जनशील माणूस म्हणून, अभ्यासक म्हणून त्याच्या
काही मर्यादा आहेत; आणि काळ तर अमर्याद आहे. या काळाला अगणित पैलू आहेत. ज्याचा परिणाम माणूस म्हणून आपल्यावर होत आहे आणि होत राहणार आहे. संशोधनाच्या प्रयोगशाळा अहोरात्र काम करत असल्यामुळे हे संकट पुढच्या काही काळात टळेलही, आणि माणूस पुन्हा एकदा त्याच्या दैनंदिनीत व्यस्त होईल. विज्ञान, व्यापार, सत्ताकारण, द्वेषाचे राजकरण यासह असंख्य
विषयाच्या मुक्तचर्चेत आणि व्यवहारात तो सामील होईल. किंवा गरजांच्या पुर्ततेसाठी तो पुन्हा एकदा कामाला लागेल. नवी मिथकं, नव्या प्रतिमांसह साहित्य
व्यवहाराची दारं पुन्हा उघडतील. म्हणजे जे जे घडायला हवं ते ते घडेलच; पण भितीपोटी घाईघाईत कबरीत गाडलेल्या हजारो प्रेतांची ओळख आपल्याला पटवता
येणार नाही. भुकेने व्याकूळ होवून थिजून गेलेल्या फुटपाथवरच्या एखाद्या
निराश्रीत माणसाच्या किंवा आपल्याच माणसांनी घरात प्रवेश नाकारल्यानंतर
झालेल्या अतोनात वेदनेचे दु:ख आपल्याला समजून घेता येणार नाही.
स्थलांतरितांची भटकंती हा ही विषय दुर्लक्षित करता येणार नाही. म्हणजे भौतिक
आणि मानसिकदृष्ट्या बदललेल्या या अनाकलनीय काळाचं चरित्र मोठं संदिग्ध
असणार आहे. समाज वास्तवाचा आपल्या जीवनानुभवातून आत्यंतिक संवेदनशीलतेणे अन्वयार्थ लावणाराच पुढच्या काळात लेखक म्हणून उभा राहू शकेल.

सामाजिक, सांस्कृतिक अनुभवाच्या या अंत:प्रवाहातून मानवी भाषेचा एक
समृद्ध उच्चार करण्याची गरज आहे. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभातच आपण विनाशाच्या कडेलोटावर येवून उभे राहिलो आहोत. या काळातल्या साहित्य आणि कलांच्या व्याख्याही बदलणार आहेत. सर्जनाची एक नवी भूमीच जणू काळाने उकरून ठेवली आहे. या भूमितले अनुभव नीटपणे आणि सखोल आस्थेने वेचण्याचा प्रयत्न लेखकांनी
करायला हवं, असे मनोमन वाटते. प्रख्यात समीक्षक द. ग. गोडसे यांच्या ‘पोत’ या
ग्रंथातील एका अवतरणाची मुद्दाम नोंद करतो. “प्रत्येक कलात्मक आविष्कार
म्हणजे कलावंताने जीवनावर केलेले भाष्य ठरते. हे भाष्य तत्कालीन जीवनाचे
प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे निरीक्षण करून केलेले असते. म्हणूनच प्रत्येक कलात्मक
आविष्काराचे पोत तपासून पाहिल्यास त्यात आपल्याला स्थितीसापेक्ष जीवनाचे
दर्शन घडते; मग त्या आविष्काराची सौंदर्यदृष्ट्या प्रतवारी कोणतीही असो-
आविष्कार निर्मितीचे स्थळ, काळ, व्यक्ती अथवा माध्यम कोणतेही असो.” तर
आपल्या रूढ भौतिक जगण्याशी सांस्कृतिक व्यवहाराशी असलेले नाते तपासून पाहण्यासाठी वरील अवतरण महत्त्वाचे वाटते. यापुढच्या वाड्मयीन, सांस्कृतिक
निर्मितीत आजच्या काळाचा चेहरा नक्कीच दिसेल.
-डॉ. पी. विठ्ठल
(लेखक नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा
संकुलात प्राध्यापक आहेत.)
मो. ९८५०२४१३३२
P_vitthal@rediffamail.com

One thought on “# कोरोनोत्तर काळाचं संदिग्ध चरित्र आणि सामाजिक, सांस्कृतिक व्यवहार -पी.विठ्ठल.

  1. सद्यस्थितीचे खूप छान विवेचन
    विविध छोट्या घटनांची मांडणी
    सुंदर लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *