सगळे जग सध्या एका भयानक, न भूतो न भविष्यती अशा संकटातून जात आहे. हे सगळे महायुद्धापेक्षा ही भयंकर स्वरूपाचे आहे. कारण महायुद्धात विशिष्ट देश, विशिष्ट सत्ताकेंद्रे संमिलीत असतात. त्या युद्धाची कारणे माहिती असतात. युद्ध थांबविण्याचे उपायही माहिती असतात. सगळे काही लढणाऱ्याच्या हातात असते. पण कोरोनाचे जागतिक संकट अनियंत्रित स्वरूपाचे आहे. त्याचे उगमाचे, प्रसाराचे कारण, त्याचे परिणाम, त्याची व्याप्ती, कालावधी हे सगळेच अज्ञात. इथे आपले आतापर्यंतचे ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, सगळेच कुचकामाचे ठरले आहे. सगळे जग आपापल्या परीने या संकटाचा सामना करण्याचा प्रयत्न करते आहे. या परिस्थितीला अनेक परिमाणे आहेत. पैलू आहेत. हा प्रश्न आता केवळ शारीरिक आरोग्यापुरता मर्यादित नाही. केवळ आरोग्याच्या दृष्टीकोनातून पाहिले तरी या संक्रमक विषाणूशी सामना करणारी लस, उपाययोजना शोधायला युद्धपातळीवर प्रयत्न केले तरी बराच कालावधी लागेल. प्रकाशात शोध घेणे सोपे असते पण चोहीकडे अंधारच अंधार असला की शोध घेणे अवघड होऊन बसते. या अवघड प्रश्नावर वेगवेगळी मते मतांतरे प्रकाशित होताहेत.
प्रत्येक देशाची या समस्येकडे बघण्याची भूमिका वेगवेगळी आहे. असणार आहे. कारण समस्या एक असली तरी तिचे स्वरूप, व्याप्ती, तेथील सामाजिक स्थिती, संस्कृती, जडणघडण, लोकांची मनोवृत्ती या सर्व बाबतीत खूप तफावत आहे. उपाय हे या सर्व घटकांवर अवलंबून असतात. वैज्ञानिकात, अर्थतज्ज्ञात, प्रशासकात एकमत नाही. त्यामुळे समस्या एक असली तरी हा गुंता सोडविण्याची पद्धत काही प्रमाणात वेगळी असणे अपरिहार्य आहे.
या संपूर्ण प्रकरणाचे जागतिक कीर्तीचे इतिहासतज्ज्ञ डॉ. नुव्हल नोआ हरारी यांनी अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे. त्यांचे सेपियन हे पुस्तक बेस्ट सेलर असून जगप्रसिद्ध आहे. या समाज शास्त्रज्ञाचा या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टीकोन महत्वाचा ठरतो..
कोरोनाआधीचे जग अन् कोरोनानंतरचे जग अशी नवी काल संकल्पना आता जन्माला येणार आहे. वेगवेगळी राज्ये, सरकारे, येत्या काळात जे महत्वाचे निर्णय घेतील, जी पावले उचलतील त्यावर आपले भवितव्य अवलंबून राहणार आहे. केवळ आरोग्याच्याच नव्हे, तर आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, मानसिक अशा सर्वांगीण बाजूनी या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल. या विविधांगाशी मूळ प्रश्नाचे असलेले संबंध अतिशय किचकट, गुंतागुंतीचे असणार आहेत. एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर कशी, कितपत अवलंबून आहे हे स्पष्ट असले की गणित विज्ञान सहज मदतीला धावून येते. इथे हे परस्पर संबंध आकलनापलीकडचे आहेत. अस्पष्ट आहेत. आपल्याला भविष्याचा विचार करताना फक्त तात्कालिक स्वरूपाचा विचार करून चालणार नाही. वेगवेगळ्या पर्यायातून नेमकी, आपल्याला उपयुक्त उपाययोजना शोधतांना, दीर्घकालीन परिणामाचा विचार करावा लागेल. म्हणजे फक्त या वादलापूरताच विचार न करता हे वादळ शमल्यानंतरची परिस्थिती काय असेल याचा वेध घेऊन, भविष्यात दीर्घ काळापर्यंत उपयोगी ठरेल अशी योजना करावी लागेल. हे दिवस जातीलच. पण या जखमांचे ओरखडे दीर्घकाळ टिकतील. आपली मुले, त्यानंतरची पिढी, त्यांचे भविष्य असा विचार करावा लागेल. कधीकधी घाईगर्दीत हाताला येईल ते तंत्रज्ञान वापरून वेळ निभावून नेण्याची आपली प्रवृत्ती असते. आपल्याला ताबडतोब परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याची घाई असते. या समस्येसाठी अशी घाई कुचकामाचीच ठरण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊनच्या काळात सारेच घरून काम करताहेत. शारीरिक अंतर पळून व्यवहार करताहेत. रेल्वे, विमान, बस अशी दळणवळणाची साधने महिनोन् महिने ठप्प असणे हे अपूर्व असेच आहे. अशा टोकाच्या परिस्थितीची कुणी कल्पनाही केली नसेल. सध्या टॅक्सी, ऑटो, बसच्या संपाने आपण हैराण होतो. पण आज आपण हे सारे बंद आपण होऊन स्वीकारले. परिस्थितीच तशी अबनॉर्मल आहे. इथे दोन बाबींचा एकत्र विचार करावा लागेल. नागरिकांच्या अधिकाराचा, सोयी सवलतींचा, अधिकाराचा एक विचार, अन् दुसरा विचार अर्थातच एकसंघ राष्ट्राचा, देशाचा, संपूर्ण विश्वाचा.
जी अभूतपूर्व परिस्थिती आपण अनुभवतो आहोत, त्याच्या साखळ्या फक्त माणसापुरत्याच मर्यादित नाहीत. पण वैयक्तिक बाबींपेक्षा, आपल्या भवतीचा निसर्ग, प्राणी, वातावरण या साऱ्यांचे संवर्धनही तितकेच महत्वाचे. काही देशांनी संपूर्ण लॉकडाऊन न करता व्यवहार चालूच ठेवले यामागे हा वैश्विक, सर्वांगीण विचार आहे.
या जागतिक आपत्तीशी सामना करताना सर्व मानवजातीने काही शिस्तीचे, कायद्याचे, नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. एकाने जरी ते पाळले नाहीत तर त्याचे परिणाम सार्यांना भोगावे लागतील अशी विचित्र परिस्थिती आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सर्वांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. इथे कसलीही लपाछपी करून चालणार नाही. सरकारशी असहयोग करून चालणार नाही. काही महिन्यांपूर्वी सीएए, एनपीआर या कायद्याविरोधात गदारोळ सुरू झाला होता. त्याला राजकीय रंग दिला गेला. उद्या स्मार्ट फोन किंवा मोबाईल अॅपच्याद्वारे तुमच्या हालचालीवर, प्रकृतीवर सरकार नियंत्रण ठेवू शकते. त्याकडे सृजनात्मक दृष्टीकोनातून बघावे लागेल. आपल्या देशाची भौगोलिक व्याप्ती, अफाट लोकसंख्या, अपुऱ्या आरोग्य सुविधा हे सारे लक्षात घेता असे नियंत्रण गरजेचे होईल. कदाचित त्यासाठी नवा कायदा करावा लागेल. लागण कुणाकुणाला, कुठे झालीय ते शोधून, आरोग्य सुविधा पोचविण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, स्मार्ट फोन, वायरलेस कम्युनिकेशन ,रोबोट तंत्रज्ञान हे सारे तातडीने वापरावे लागेल. इस्राएलसारख्या देशात शत्रूसाठी उपयोगात येणारी हेरगिरीची यंत्रणा कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरण्यात येत आहे. रोग, आपदा आगळी वेगळी, अभूतपूर्व असेल तर उपायदेखील नाविन्यपूर्ण, अभूतपूर्व स्वरूपाचे, न पाहिलेले, न ऐकलेले असेच असणार. त्यासाठी काही देशांना आणीबाणीचा वेगळा कायदा देखील करावा लागेल इस्राएलसारखा.
प्रत्येक नागरिकाला एक इलेक्ट्रॉनिक कडे हातात घालावे लागेल. त्याद्वारे त्याचे तापमान, रक्तदाब, नाडी साखरेचे प्रमाण अशा महत्वाच्या नोंदी, ब्लू टूथ तंत्रज्ञानाद्वारे सरकारी आरोग्य यंत्रणेकडे तत्काळ पोहचू शकेल. डॉक्टरकडे न जाता हे तपासता येईल. तातडीची गरज असल्यास मदत करता येईल किंवा जागच्या जागी सल्ला देता, घेता येईल. हे सायन्स फिक्शन म्हणून बाजूला सारण्यासारखे नाही, ते प्रमाण सत्य म्हणून स्वीकारावे लागेल. अशी माहिती सार्वजनिक होणे म्हणजे स्वातंत्र्याबर घाला,अशी राजकीय ओरड होणे स्वाभाविक. पण काही बाबतीत नागरिकांच्या वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रहित, वैश्विक हित जास्त महत्वाचे, मोलाचे हे विसरून चालणार नाही. यासाठी लोकांना सुशिक्षित करणे, समजावणे, विश्वासात घेणे महत्वाचे. नीट समजावले की लोक समजतात, हे आपण अनुभवले आहे. विरोध करणारे विकृत समाजकंटक असतात हेही विसरता कामा नये. तिथे राष्ट्र हितासाठी कडक धोरण स्वीकारावे लागेल.या आपत्तीकाळात जात, धर्म, पक्ष विसरून सर्वांना एकत्र यावे लागेल. राष्ट्रांनासुद्धा आपापसातील मतभेद विसरून एकत्र काम करावे लागेल. शत्रू, मित्र या नात्यापलीकडे व्यापक सर्वहिताचा विचार करावा लागेल. स्वयंशिस्त, सेल्फ मोटिव्हेटेड समाज हा अधिकारशाहीन नियंत्रित हुकूमशाही समाजापेक्षा केव्हाही शहाणा, श्रेष्ठच.
साध्या हात धुण्याच्या क्रियेचा जरी विचार केला तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करीत होतो. बाहेरची पादत्राणे घालून घरात प्रवेश करीत होतो. आता मरण्याच्या भीतीने सारे खडबडून जागे झाले. अनेक वर्षांपूर्वी तर डॉक्टर, नर्सेससुद्धा शस्त्रक्रियेला जाण्यापूर्वी हात धूत नसत म्हणे! ही स्वच्छता, सॅनिटायझेशन गेल्या काही दशकात आले. अजूनही सरकारी दवाखान्यातील स्वच्छता कोणत्या पातळीचे असते हे आपण अनुभवतोच. झोपडपट्टीत किती स्वच्छता असते हेही जाणतोच. माहिती असूनही याकडे सरकारचे, पालिकेचे दुर्लक्ष होते. स्वच्छतेची सर्वोच्च पातळी गाठण्यासाठी कायद्याचा बडगा नव्हे तर स्वयंशिस्त, परिस्थितीचे गांभिर्य जाणून घेण्याची आकलनशक्ती हे सारे महत्वाचे. जनतेचा सरकारवर, सरकारचा जनतेवर विश्वास महत्वाचा. मुख्य म्हणजे राष्ट्रीय चारित्र्य महत्त्वाचे. त्यासाठी आधी परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण करावे लागेल. ही जागतिक समस्या आहे. त्यामुळे वैश्विक सहकार्य महत्वाचे. जागतिक आरोग्य संघटनेची भूमिका महत्त्वाची. प्रत्येक देशातील वातावरण, परिस्थिती वेगळी असणार. त्यामुळे एकच उपाययोजना सर्वांना लागू होणार नाही. तरी आपले अनुभव,आपली माहिती, डेटा यांचे आदान प्रदान करणे, निदानाचे, निष्कर्षाचे, देवाणघेवाण करणे, वैज्ञानिकांनी एकत्र चर्चा, विश्लेषण, संशोधन करणे गरजेचे ठरणार आहे. इथे फक्त आपल्यापुरता संकुचित विचार न करता, सामूहिक प्रयत्न करावे लागतील.
मानवीय दृष्टीकोनातून, परस्पर सामंजस्याच्या भूमिकेतून, विश्वासाच्या बळातून पारदर्शीपणे ही देवाण घेवाण झाली पाहिजे. उच्च पातळीवर झाली पाहिजे. त्यासाठी राष्ट्रप्रमुखांनी आचारसंहिता तयार करावी, पाळावी. वैज्ञानिक, समाजशास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ, सामाजिक संस्था यांनी आपले विचार, आपले निष्कर्ष माध्यमातून शेअर केले पाहिजे. इथेही धोक्याचा इशारा देणे गरजेचे. सध्या सोशल मीडियावर जो गोंधळ, धुमाकूळ सुरू असतो तो विश्वसनीय तर नसतोच पण चुकीचाही असतो. त्यामुळे सरकारी पातळीवर,नियंत्रित स्वरूपात अशी देवाणघेवाण झालेली उत्तम. डॉक्टरांनी जर्नलमधून निष्कर्ष प्रसिद्ध करावे,तंत्रज्ञांनी वेबिनारद्वारे व्यक्त व्हावे. महत्वाची माहिती सरकारी पातळीवर राजदूतांमार्फत शेअर करावी. साहित्याचे देवाणघेवाण देखील शक्य आहे. औषधे, किट्स, इतर सामुग्री एकमेकांना पुरवता येईल. व्यापारी भूमिकेतून नव्हे तर मानवीय दृष्टीकोनातून याकडे बघावे. हे जागतिक सहकार्य कोरोना पुरते, आरोग्य क्षेत्रापुरते मर्यादित न ठेवता, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातही विस्तारता येईल.
सध्या लाॅकडाऊनमुळे शिक्षण संस्था, उद्योग, पर्यटन, प्रवास अशा सर्व क्षेत्रात मंदीचे, निराशेचे वातावरण आहे. या सर्व घसरलेल्या गाड्या रुळावर आणाव्या लागतील.
सगळीकडेच अपंगत्व आले आहे.
कोरोनाच्या बाबतीत आणखी एक अडचण आहे. ती म्हणजे उपलब्ध आकडेवारीचे विश्लेषण अन त्यावरून भविष्याचे अंदाज. गणिती मॉडेल, संख्याशास्त्राचे विश्लेषण, संगणकाचे निष्कर्ष हे उलब्ध डेटा किती अचूक, विश्वसनीय आहे. त्यावर अवलंबून असते. सध्या माध्यमातून प्रसिध्द होणारे सरकारी आकडे निश्चितच विश्वास ठेवण्यालायक नाहीत हे आपल्याला कळून चुकले आहे,सरकारलाही ते माहिती आहे. चीन,अमेरिका यांच्यावर माहिती लपवल्याचा आरोप होतो. इतर देशांच्या बाबतीत तीच परिस्थिती आहे. कुणी ही हरिश्चंद्र, धर्मराज नाही. सरकारी यंत्रणाच माहिती लपवते असे नाही. नागरिक देखील भीतीमुळे माहिती लपवतात. सध्या ही मरणाची भीती टोकाला पोहोचली आहे.अनेक जण रोगाची लक्षणे असूनही चूप बसतात. इतरांना संसर्ग करतात. हे फार धोक्याचे.
कोरोनाबाबतीत अनेक गोष्टी अज्ञात आहेत. कुणालाच निश्चित अशी पूर्ण माहिती नाही. जी माहिती येते, मिळते, त्यात करे काय खोटे काय हे समजणे कठीण. जी माहिती येते ती शास्त्रीय, विश्वसनीय असेल याची खात्री नाही. शंभर वर्षांपूर्वीचे प्रसिध्द, विख्यात जर्नल, लांसेटमध्ये मागच्या महिन्यात प्रसिध्द झालेले दोन संशोधन निबंध मागे घेण्याची नामूषकी लेखकावर, संपादकावर आली होती. हा अंधारातला, अज्ञानातला प्रवास आहे. शास्त्रीय अनुमान वर्तविण्यासाठी मूळ माहिती डेटा खरा असावा लागतो. इथे तीच अडचण आहे.त्यामुळे कुठलेही तंत्रज्ञान, विज्ञान या स्थितीत शंभर टक्के काम करणार नाही.
समस्या सुटेल, उत्तर सापडेल पण तोपर्यंत खूप नुकसान झाले असेल, बरीच पडझड झाली असेल. जगण्याचे अर्थ बदलले असतील. जगाचे स्वरूप, प्रारूप बदलले असेल. या बदलाला सामोरे जायला आधी आपणा सर्वांना बदलावे लागेल. हे बदल साधेसुधे नसतील. आपल्या ऐकिवातील, पाहण्यातील नसतील.ते सर्वार्थाने क्रांतिकारक बदल असतील.
ज्येष्ठ नागरिकांनी आतापर्यंत बघितलेले, अनुभवलेले जग अन् यापुढे आपली मुले, विशेषकरून आपली नातवंडे, ज्या जगाला सामोरे जातील ते जग सर्वार्थाने भिन्न असेल, आगळे वेगळे कल्पनातीत असेल ह्यात शंका नाही.
-डॉ. विजय पांढरीपांडे
लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे माजी कुलगुरू आहेत.
ईमेल: vijaympande@yahoo.com
मोबाईल: 7659084555
अतिशय उपयुक्त लेख लिहिला आहे. कोरोना नंतरचे जग निश्चितच बदललेले असेल.
अत्यंत माहितीपूर्ण असा लेख आहे भविष्याचा अचूक असा वेध घेतला आहे यातून बरेच आत्मसात करण्यासारखे आहे