पुणे: बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. गुरुवार, २५ व शुक्रवार, २६ जून असे दोन दिवस राज्यात सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
गेले काही दिवस महाराष्ट्रात मसूनची गती मंद झाल्याने राज्यात तो थांबला होता. मात्र, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने वाऱ्याचा वेग वाढलाय त्यामुळे २४ जूनपासूनच काही भागात हलका पाऊस सुरू झाला. २५ व २६ जून या दोन दिवसात कोकण, मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. मात्र, २७ रोजी तो पुन्हा विश्रांती घेईल. २८जूनला फक्त कोकण भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. सध्या मान्सूनचा जोरदार प्रवास गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लद्दाखकडे सुरू असून तेथे जोरदार पाऊस सुरू आहे.