मुंबई: 30 तारखेपासून लॉकडाऊन उठणार नाही. मात्र, ते कायम राहणार का, तर तेही नाही. हळूहळू एक एक गोष्ट करत आहोत. अजूनही संकट टळले नाही. पुनश्च हरिओम याचा अर्थ आपण कात्रीत सापडलो आहोत. तोल सांभाळून पुढे जायचे आहे. अनावश्यक कामांसाठी बाहेर पडू नये, आपलं सरकार काळजीवाहू नाही, हे सरकार तुमचे आहे. मजबूत आहे. महाराष्ट्राची काळजी घेणारे सरकार आहे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केले.
फेस बुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी आज संवाद साधला. ते पुढे म्हणाले, बाहेर पडलो तर प्रत्येक पावलांवर धोका आहे. महाराष्ट्रातील जनतेचा सरकारवर विश्वास आहे. तुम्ही सर्व सूचना पाळता, त्यामुळे मला तुमचा अभिमान आहे. ग्रामीण भागात उद्योग सुरू आहेत. लोकल सुरू झाल्या आहेत, शेतकरी लॉकडाऊन असताना अपार मेहनत करतो आहे. त्यांच्यासोबत आपण आहोत. काही भागातून बोगस बियाणांच्या तक्रारी आल्या आहेत. त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला फसवले आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कर्जमाफी अचारसंहितामुळे रखडली आहे. तरी ती पूर्ण केली जाईल.
आषाढीवारीसाठी मी जाणार आहे.२०१० साली मी पांडुरंगाचे दर्शन घेतले. हेलिकॉप्टरमधून मी वारीचे चित्रण केले. मी आपल्यावतीने विठुरायाला साकडं घालणार आहे. कोरोनाच्या विचित्र परिस्थितीमुळे वारकऱ्यांना घरातून दर्शन घ्यावे लागणार आहे. मी कोरोनाचे संकट दूर व्हावे, यासाठी विठुमाऊलीला साकडं घालणार आहे. तुमचा प्रतिनिधी म्हणून पंढरपूरला जाणार आहे. आषाढीनंतर दहिहंडी येणार आहे. परंतु सर्वांना सामाजिक भान ठेवून हा उत्सव रद्द केला आहे. पुढे गणेशोत्सव आहे. नवरात्री आहे. इद आहे. दिवाळी आहे.
मी सर्व गणेशमंडळांची बैठक घेतली. सर्वांनी सरकारवर विश्वास दाखवला आहे. यावेळी सामाजिक भान ठेवून हा उत्सव साजरा करायचा आहे. मूर्तीची उंची आता कमी ठेवावी. मूर्तीची उंची चार फूटापर्यंत ठेवावी. गणेशोत्सव कसा साजरा करणार असा प्रश्न येतो. त्यावर अजून बैठक घेणार.
रक्तदानाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर प्लाझ्मा थेरपीची गरज आहे. आपण जगासोबत आहोत. कुठे काय चाललंय. याचा आढावा घेत आहोत. उद्यापासून प्लाझ्मा थेरपी देणारे केंद्रांची संख्या वाढवत आहोत. सर्वाधिक केंद्र सुरू महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे. जे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यांनी पुढे येऊन प्लाझा द्या. रक्तदानाप्रमाणे प्लाझ्मादान करा.
जी औषधं उपलब्ध आहेत. त्यांचा आपण वापर करत आहोत. गेल्या आठवड्यात केंद्राकडून आपल्याला रेमडिसिबन औषध वापरण्यास परवानगी मिळाली. ही औषधं मोफत देण्याचा आमचा प्रयत्न आहे. एकदा हा साठा सुरू झाल्यानंतर त्याचा तुडवडा होणार नाही. रुग्णांची संख्या वाढणारच. अर्थचक्राला गती देताना हे होणारच. रुग्णांची संख्या वाढवली कारण आपण टेस्ट वाढली आहे. टेस्ट द व्हायरस सुरू केली आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे. औषधांची कमी पडणार नाही.
अनुभवी डॉक्टरांनी न घाबरता रुग्णालय सुरू करा. आवश्यक त्या सुविधा मिळतील. आरोग्य सुविधा वाढत आहोत. टेस्ट वाढवत आहोत. रॅपिड कीट घेत आहोत. त्यामुळे रुग्णांची संख्या समजणार आहे. पुढील काळात पावसाळा आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. मलेरिया आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. एकामागोमाग संकटाची साखळी तोडण्याची गरज आहे.
आजही काही ठिकाणी सर्व सुरळीत झाल्यासारखे वागत आहेत. आपणही कोविडला बळी पडू नका. कोरोना हा व्हायरस वाढतो आहे. काळजी घेऊन पुढे जायचे आहे. कर्जमाफीची योजना अपूर्ण राहिली ती पूर्ण करतो. ३० जूनला रेशनकार्डची योजना संपते. ती तीन महिन्यांसाठी वाढवून देण्याची मी पंतप्रधानमंत्र्यांकडे मागणी केली आहे. मला खात्री आहे, त्यांना याची कल्पना आहे.
अर्थचक्राच्या बाबतीत आपण खचून गेलो नाहीत. काही दिवसांपूर्वी १५ हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहे. या संकटात उद्योग विभागाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा. उद्योगांसाठी अनेक नियम शिथिल केले आहे. एकदा आल्यानंतर तुम्हाला काहीही अडचणी येणार नाहीत. उद्योग पर्यंटन वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.
शिक्षण कसे सुरू होणार यावर आपण लक्ष देत आहोत. एकएक गोष्ट आपण करत आहोत. यापुढे सरकारला सहकार्य करा, लॉकडाऊन म्हणजे सर्व काही उघडतो आहोत, असे समजू नका. कारणाशिवाय बाहेर पडू नका. कुटुंबियांची काळजी घ्या. तरुणांनो बाहेर प़डू नका. ८० टक्के लोकांना लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. काही दिवस काळजी घ्यावी लागणार आहे. ज्येष्ठ डॉक्टरांनी जातीने लक्ष घालून पुढे यावे. त्यांनी सर्व सहकार्य केले जाईल. अजूनही संकट टळले नाही. लॉकडाऊन पुन्हा करण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.