सध्या कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सुरूवातीला दहा वीस, पन्नास, शंभर अशी वाढणारी रूग्णसंख्या दररोज दोनशेच्यावर वाढत जाऊन आता जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या पाच हजारांच्या वर गेली आहे. कोरोनाची रूग्णसंख्या वाढत चालल्याने चिंता वाढणे साहजिक व स्वाभाविक आहे. यामध्ये प्रशासन कुठे कमी पडले. शासनाचे काही चुकले का? यावर चर्चा झडू लागली. प्रशासनाच्या हेकेखोरीमुळे रूग्णसंख्या वाढत असल्याचा आरोप राजकीय नेत्यांकडून करण्यात आला, तर अधिकाऱ्यांनीही आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
शासन व प्रशासन अशा दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप होत राहिले. त्यामुळे मूळ मुद्दा बाजूला पडावा तसे काहिसे झाल्याने शासन प्रशासन प्रभावी उपाययोजना राबवण्यात कमी पडले असेलही कदाचित म्हणून रूग्णसंख्या वाढत गेली, असे म्हणणेही खरे तर धाडसाचेच ठरेल. प्रत्येकजण आपआपले काम करत आहे. तरीही कोरोनाचा विळखा वाढत आहे. याचा विचार सगळ्यांनीच करायला पाहिजे. मुळात ही संख्या वाढण्यात सर्वसामान्य नागरिकांचीही काही जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्वच नेते व अधिकारी सांगताहेत की, खूपच महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका? तरीही आपण या सूचना पाळतो का, याचाही विचार होणे गरजेचे आहे.
राजकीय नेतृत्व म्हणत आहे की, प्रशासकीय यंत्रणा कमी पडली, आम्हाला विश्वासात घेतले जात नाही, तर अधिकारी म्हणतात, आम्ही आमचे काम चोखपणे करत आहोत, इतकेच नव्हे तर आम्ही रूग्णांना त्यांच्या जवळ जाऊन सेवा देत आहोत. असे असले तरी औरंगाबाद जिल्ह्यात रूग्णांची संख्या वाढत चालली आहे, हे नाकारून चालणार नाही.
अशा परिस्थितीत माध्यमांनी शासनाची किंवा प्रशासनाची बाजू न घेता निरपेक्ष व परखङपणे भूमिका बजावणे अपेक्षित आहे. कुणी चुकत असेल तर त्यांना त्यांच्या चुका दाखवून देणे हे क्रमप्राप्त आहे. मात्र, जर तुम्ही चुका दाखविण्यापेक्षा थेट निर्णायक भूमिका वटवणार असाल तर ते कुणालाही चालणार नाही. मात्र, काही अपवाद वगळता अलिकडे असंच होताना दिसत आहे. मागे एका कार्यक्रमात एक ज्येष्ठ संपादक असे म्हणाले होते, की आपल्याकडे मराठी वृत्त वाहिन्यांनी तर कोरोनाचे रिपोर्टिंग क्रिकेटच्या कॉमेंट्रीसारखं केलं आहे. इकडे इतके सापडले, तिकडे तितके सापडले, अशा पद्धतीने हे रिपोर्टिंग होतं, अन् ते खरं होतं. सांगायचा मुद्दा हा आहे की, अलिकडे माध्यमं तटस्थपणे भूमिका बजावताना दिसत नाहीत. थेट निकराची अन् टोकाची भूमिका घेताना दिसत आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे जे काही मृत्यू झाले आहेत, त्याचं वार्तांकन करताना, त्या नागरिकांचे मारेकरी कोण? हा प्रश्न अशा पद्धतीने या माध्यमाने विचारला की, जसे काय, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांनी हातात तलवारी घेऊन या नागरिकांचे मुडदे पाडले की काय, असे वाटावे. मुळात अशा अतिशयोक्तपणे व अतिरंजितपणे वार्तांकन करणे योग्य आहे का? तुमच्या हातात प्रसार माध्यम असलं म्हणजे, अशी मारेकरी कोण? अशी भाषा वापरता, त्यांना अपयशाचे धनी म्हणून हिनवता. मुळात इथे या अधिकाऱ्यांची बाजू घेणे हा उद्देश नाही, त्यांचे काही चुकलेही असेल. त्यांना त्यांच्या चुका दाखवून देण्यात काहीही गैर नाही, तर ते आपले कामच आहे. मात्र, अशा अतिरंजीतपणे वार्तांकन केल्याने कोरोनावर नियंत्रणासाठी काम करणाऱ्यांचे खच्चीकरण केल्यासारखे होणार आहे. अधिकाऱ्यांचे काही चुकले असेल तर त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली पाहिजे. याबरोबरच त्यांचीही बाजू समजून घेऊन तुम्ही त्यांचीही बाजू मांडणे अपेक्षित असताना, असा अततायीपणा केल्यास वाद मिटण्याऐवजी आणखीच वाढेल व यामध्ये कुणाचेही भले होणार नाही…
-विलास इंगळे, संपादक
maharashtratoday.live
ईमेल: vilas.single@gmail.com
संपर्क: 9422210423
उत्तम विश्लेषण,परखड अपेक्षा,प्रखर वास्तव
असे हे संपादकीय!!!