# मध्यमहाराष्ट्र, कोकणात मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस.

 

पुणे: गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे पुन्हा आगमन झाले असून, सोमवारी राज्यात सर्वदूर हलका ते मुसळधार पावसाने हजेरी लावली. विशेषत: मध्यमहाराष्ट्र, कोकण या भागात मुसळधार तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस रायगड, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा (घाटमाथा) मुसळधार पाऊस पडेल,  असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

आजवरच्या गेल्या तीस वर्षात सलग सोळा वर्ष जून महिना कोरडा गेला असून, अनेक वर्षाच्या कालावधीनंतर यावर्षी जून महिन्यात सरासरीपेक्षा वीस टक्के जास्त पाऊस पडला आहे.  राज्यात आठ ते दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर बंगालच्या उपसागर व अरबी समुद्रातील अनुकूल स्थितीमुळे मान्सूनने पुन्हा एकदा गती घेतली असून, पुढील तीन दिवस राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार तर मराठवाडा आणि विदर्भात मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. सध्या दक्षिणपूर्व अरबी समुद्राबरोबरच मध्यपूर्व अरबी समुद्र, मराठवाडा तसेच आंध्रप्रदेशची किनारपट्टी या भागावर चक्रीय स्थिती तयार झाली आहे. या स्थितीमुळेच राज्यात पाऊस सुरू झाला आहे.

गेल्या चोवीस तासात राज्याच्या काही भागात पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे (मिमीमध्ये):
वेंगुर्ला-100, लांजा-60, माथेरान-50, सावंतवाडी-50, इंदापूर-90, मेढा-80, माळशिरस-60, गगनबावडा-50, पंढरपूर-40, गंगापूर-90, कन्नड-50, सिल्लोड-40, पाटोदा-30, सिंदखेड राजा-30, सावनेर-20,

मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात जूनमध्येच मुसळधार:
मुंबई व कोकणात देखील यंदा कमी पाऊस आहे. पण दुष्काळी पट्ट्यातील मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात ऐन जून महिन्यात मुसळधार पाऊस झाला आहे. कारण त्या भागात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत, अशी परिस्थिती गेल्या पंधरा ते सोळा वर्षात पहिल्यांदाच तयार झाली असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *